संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबरकसून आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतानाही दिसत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधील बनासकांठा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जबरदस्त हल्ला चढवला. यावेळी त्यांनी राहुल गांधींसहकाँग्रेसला अप्रत्यक्षपणे तीन आव्हानं दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी काँग्रेसच्या राजकुमाराला, काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या सर्व गाजा-बाजा वाजवणाऱ्या जमातीला आव्हान देतो. हिम्मत असेल तर घोषणा करावी की, ते कधीही धर्माच्या आधारावर, ना आरक्षणाचा दुरुपयोग करतील, ना संविधानात छेडछाड करतील, ना धर्माच्या आधारावर कुणाला आरक्षण देतील..."
पंतप्रधान पुढे म्हणाले, "ते (काँग्रेस) अशी घोषणा करणार नाही, कारण 'दाल में कुछ काला है'. मी त्यांना खुलं आव्हान देत आहे. मी जगासमोर आणि देशासमोर ऑन रेकॉर्ड बोलत आहे. जोवर भाजप आहे, जोवर मोदी आहे, तोवर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे, त्यानुसार, एससी/एसटी, ओबीसी आणि सामान्य वर्गातील लोकांना जे आरक्षण दिले आहे, त्याचे पूर्णपणे संरक्षण केले जाईल."
मोदी म्हणाले "काँग्रेसकडे ना मुद्दे आहेत, ना कुठला दृष्टीकोन आहे. काँग्रेसकडे कुठले काम करण्याची धमकही नाही. त्यांचे काम केवळ मोदीला शिव्या देणे एवढेच आहे. काँग्रेसचे राजकुमार प्रेमाचे दुकान घेवून निघाले होते, मात्र त्यांनी प्रेमाच्या दुकानात फेक व्हिडिओजचा धंदा सुरू केला आहे. त्यांचे प्रेमाचे दुकान आता फेक फॅक्टरी बनले आहे,"