बंगळुरू - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पेटला असून, त्या मुद्द्यावरून दोन्ही राज्यातील राज्य सरकराने आणि नेते आमने-सामने आले आहेत. दरम्यान, बेळगाव दौऱ्यावर जाण्याचं नियोजन करत असलेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे.
बेळगावमध्ये येण्याचं धाडस केल्यास कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असा इशारा बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना दिला आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोम्मई यांनी सांगितले की, या प्रकरणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये न पाठवण्याचं आवाहन करणार आहे. या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच सीमाभागातील अधिकाऱ्यांनाही कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे बोम्मई यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादादरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे ६ डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे जाणार होते. यावेळी ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना भेटणार होते. तसेच सीमावादावर त्यांच्यासोबत चर्चा करणार होते. त्याआधी या दोन्ही मंत्र्यांचा दौरा ३ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आला होता.
दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबतची फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणले की, मंत्र्यांचा बेळगाव दौरा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता. त्यासाठी एका कार्यक्रमाला मंत्री जाणार होते. त्यात महाराष्ट्राचं काही म्हणणं आहे. कर्नाटकचं काही म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर ते जाऊ शकतात. त्यांना जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाही. मात्र महापरिनिर्वाण दिनी असा वाद तयार करायचा का हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे यासंदर्भात काही ना काही विचार आम्ही करतोय. माननीय मुख्यमंत्री आम्हाला याबाबत अंतिम निर्णय देतील. महापरिनिर्वाण दिन आमच्यासाठी मोठा दिवस आहे. त्यादिवशी एखादं आंदोलन व्हावं. कुठलीही चुकीची घटना व्हावी हे योग्य नाही. भविष्यात आपल्याला तिथे जाता येईल. तिथे जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.