ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही लोकांकडून पुष्पगुच्छ का स्वीकारता ? तुम्ही आणि बाकीचे मंत्री पुष्पगुच्छ स्वीकारणं बंद करु शकत नाही का ? फक्त तुम्ही जरी असं केलत तर दीड कोटी रुपये वाचतील..असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अॅपवर अशा प्रकारच्या सूचना लोकांकडून येत आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला भाषण करणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर त्यांनी लोकांकडून सूचना मागवल्या होत्या.
आशीष आनंद या व्यक्तीने हा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदी 9 ऑगस्टला मध्यप्रदेशमध्ये गेले होते तेव्हा त्यांना 10 ते 15 पुष्पगुच्छ देण्यात आले. स्विकारल्यानंतर मोदींनी लगेच पुष्पगुच्छ आपल्या सुरक्षारक्षकांकडे सोपवले. 'त्या फुलांचा सुगंध घेता येईल, त्याआधीच दुसरा पुष्पगुच्छ तुमच्या हातात होता. तुम्ही रोज हजारो लोकांना भेटता, जे तुमच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ देतात', असं आशीष आनंद यांनी लिहिलं आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षातील 300 दिवसांत रोज 10 लोकांची भेट घेतली तर किमान 10 ते 15 पुष्पगुच्छ ते स्विकारतील. एका पुष्पगुच्छाची किंमत 500 रुपये धरली तर वर्षाला 1.5 कोटी रुपये खर्च होतात', असंही आशिष आनंद यांनी लिहिलं आहे. 'पुष्पगुच्छ स्विकारण्यापेक्षा त्याचे पैसे जमा केल्यास तो पैसा विकासकामात वापरु शकतो', असं आशिष आनंद यांचं म्हणणं आहे.
एका व्यक्तीने शहिदांच्या कुटुबांतील सदस्यांच्या बँक खात्याची माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन लोक त्यांना आर्थिक मदत करु शकतील. दुस-या एका सूचनेत पंतप्रधान मोदींना 15 ऑगस्टच्या भाषणात लोकांना सुट्टीनिमित्त पिकनिकला न जाण्याचं आवाहन करण्याचं सुचवलं आहे. त्याऐवजी आपल्या मुलांना स्वातंत्र्य लढ्याशी आधारित चित्रपट दाखवले जावेत असं सांगण्यात आलं आहे.