चेन्नई :तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुक आणि राज्यपाल आर. एन. रवी यांच्यात पेटलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. राज्यपाल आंबेडकरांचे नाव घेऊ शकत नसतील तर त्यांनी काश्मीरला जावे, जेणेकरून तेथे अतिरेक्यांकडून त्यांचा खात्मा होईल, असे विधान एका द्रमुक कार्यकर्त्याने केले. यावरून पुन्हा रणकंदन माजले असून, राज भवन, भाजपने पोलिसांकडे संबंधित कार्यकर्त्याविरुद्ध स्वतंत्र तक्रारी दिल्या आहेत.
तुम्ही राज्यघटनेच्या नावाने शपथ घेतली की नाही? ही घटना लिहिणारे माझे आजोबा आंबेडकर हे होते की नाही? जर तुम्ही त्यांचे नाव घेणार नसाल तर तुम्ही काश्मीरला जा. आम्ही स्वत: एक अतिरेकी तिकडे पाठवू व यांना गोळ्या घाला म्हणून त्याला सांगू, असे द्रमुक कार्यकर्ते शिवाजी कृष्णमूर्ती म्हणाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर द्रमुकचे नेतेही उपस्थित होते. दरम्यान, द्रमुकने कृष्णमूर्ती यांच्या या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले आहे. (वृत्तसंस्था)