ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - हरियाणा येथील दुग्धउत्पादक शेतकरी पेहलू खान यांची गो तस्कर म्हणून कथित गोरक्षकांनी काही दिवसांपूर्वी हत्या केली. याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करणार, असा आक्रमक इशारा पेहलू खान यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
"घटना घडून दोन आठवडे लोटले मात्र तरीही मुख्य आरोपीला अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही", असे सांगत पेहलू यांचा भाचा अब्दुल कयूम यानं तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, यावेळी आत्मदहनाचा इशाराही दिला.
कयूम आणि त्यांचे अन्य नातेवाईक नागरिक अधिकार संघटना पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज यांच्या नेतृत्वात होणा-या निदर्शनात सहभागी होण्यासाठी जयपूर येथे आले होते. यावेळी कयूम यांनी सांगितले की, "आम्हाला मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घ्यायची होती. मात्र त्या ओडिशामध्ये असल्याचे आम्हाला माहिती नव्हते. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जयपूरमध्ये येत राहणार".
तर दुसरीकडे पेहलू यांचे काका हुसैन यांनी सांगितले की, "जर पेहलू यांना जयपूर किंवा गुडगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबीय दहशतीखाली आहे. पेहलू यांची मुल इरशाद आणि आरिफ दोघंही अजून सावरू शकलेली नाहीत".
काय आहे नेमकी घटना?
हरियाणातील मेवात येथील दुग्धउत्पादक शेतकरी पेहलू खान (५५) यांनी दुभती म्हैस विकत घेण्याऐवजी दुभती गाय विकत घेतली आणि त्यांना तस्कर समजून कथिक गोरक्षकांनी ठारच मारले. पेहलू खान यांना गाईंची तस्करी करत असल्याच्या आरोपाखाली काही जणांकडून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पेहलू खान यांच्यासहित एकूण पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
पेहलू खान यांना एक म्हैस विकत घ्यायची होती. दुग्धउत्पादक शेतकरी असल्याने रमजान महिन्यात दुध उत्पादन वाढवून जास्तीत जास्त नफा मिळवावा यासाठी ते प्रयत्न करत होते. पण पेहलू खान यांना विक्रेत्याने त्यांच्यासमोर एका गाईचं 12 लिटर दूध काढून दाखवलं, आणि त्यांनी ती गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला. विक्रेत्याने माफक किंमत सांगितल्याने पेहलू खान तयार झाले आणि ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.
पेहलू खान यांचा मुलगा इरशादही त्यादिवशी दुस-या पिकअप ट्रकमधून प्रवास करत होता. त्या ट्रकमध्ये दोन गाई आणि वासरं होती. "वडिलांना गाडीतून खेचून बाहेर काढत मारहाण करण्यात आली. त्यांना काठ्या, पट्ट्याने मारहाण सुरु होती. त्यांच्यासोबत इतर चौघांनाही मारण्यात आलं", असं इरशाद सांगतो. "घटनेनंतर अर्ध्या तासाने पोलीस पोहोचले", असल्याचा आरोप इरशादने केला होता. तोपर्यंत वडील पूर्णपणे बेशुद्ध झाले होते.
पेहलू खान हरियाणाचे रहिवासी होते. पशु मेळामधून त्यांनी या गाईंना विकत घेतलं होतं. त्यांनी कागदपत्रं सादर करुनही त्यांना मारहाण करण्यात आली. गाडीतून बाहेर खेचून, पाठलाग करुन त्यांना मारहाण करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांच्या पिक अप व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी आपले वडील आणि इतरांकडील 35 हजार रुपयेही लुटून नेण्यात आल्याचा आरोप इरशादने केला.