बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी अयोध्येमध्ये २२ जानेवारा २०२४ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. भाजपाराम मंदिराच्या बहाण्याने आपलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्केटिंग करत आहे, असा आरोप त्यांनी केला. बिहारमधील झांझरपूर येथे माजी खासदार रामदेव भंडारी यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यासाठी तेजस्वी यादव आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.
तेजस्वी यादव यांनी सांगितले की, आम्ही लोकांना नोकऱ्या देत आहोत. तर हे लोक ईडी आणि सीबीआयला वारंवार आमच्या घरामध्ये घुसवत आहेत. मात्र हे पाहून सर्वसामान्य लोक थकले आहेत. मी तर ईडी आणि सीबीआयला लहानपणापासून पाहत आहे. या गोष्टींमुळ थोडाच फरक पडतोय. आम्ही लोक भांडत राहू. राम मंदिरावर टीका करताना तेजस्वी यादव म्हणाले की, आजारी पडलात तर रुग्णालयात जाणार ना? भूक लागल्यावर मंदिरात गेल्यावर भोजन मिळणार का? उलट तिथे तुमच्याकडून दान मागितलं जाईल.
तुम्ही सर्वांनी आता जागे होण्याची गरज आहे. मी कुठल्याही धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही आहे. मी तर स्वत: मुंडन करून आलोय. छठ पूजा माझ्याही घरामध्ये होते. देव माझ्याही हृदयात आहे. भाजपावाले सांगतात भगवा आम्ही घेऊन आलोय म्हणून. मात्र आमच्या तिरंग्यामध्येही भगवा आहे. हिरवा रंगही आहे. मात्र हिरवा रंग घेऊन फिरल्यास पाहा द्वेश निर्माण करतोय म्हणून सांगतील.
अयोध्येमध्ये लाखो कोटी रुपये खर्च होत आहेत. त्या पैशांमध्ये कित्येक लोकांना नोकरी मिळाली असती. शिक्षण मिळालं असतं. सध्या मीडिया दिवसभर आम्हाला राम मंदिराबाबतच विचारत आहे. भगवान श्रीरामांना मोदींची गरज आहे? भगवान रामांना वाटलं असतं तर त्यांनी आपला महाल स्वत:च बांधून घेतला नसता का? मात्र मोदी आपणच रामाला घर आणि महाल बांधून दिला, असं भासवत आहेत. हे सर्व निरर्थक आहे. श्रद्धा मनात असली पाहिजे. नियत साफ असली पाहिजे. पाप करून राम राम करत राहिलं, तर राम आशीर्वाद देणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.