ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवलं तर आपण १५व्या शतकाइतक्या मागास व्यवस्थेत जाऊ असं स्पष्ट शब्दात सांगत श्री श्री रवीशंकर यांनी ३७७ कलम हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही स्तरावर महिला व पुरूष भेदभाव असता कामा नये असं सांगत शनीशिंगणापूरप्रकरणी पण चर्चेने हा प्रश्न सोडवला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
नेटवर्क १८ शी बोलताना रवीशंकर म्हणाले की, रविवारी आपण शनीशिंगणापूरच्या विश्वस्तांना भेटणार आहोत. त्यांनी काशी विश्वनाथ आणि तिरुपती बालाजी या दोन मॉडेलप्रमाणे आचरण करावे असा सल्ला ते देणार आहेत. या दोन्ही ठिकाणी स्त्री-पुरूष भेदभाव नसल्याचे रवीशंकर म्हणाले.
हिंदू धर्मामध्ये असा भेदभाव नसून, गेल्या काही काळात तो तयार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेत स्त्री पुरूष समानता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थात काही ठिकाणी काही शतके वेगळ्या परंपरा पाळल्या जात आहेत, आणि त्या मोडण्याचं धैर्य अनेकांमध्ये नाहीये. तुम्ही परंपरा मोडलीत तर काहीतरी वाईट घडेल अशी मानसिक भीती यामागे आहे.
आंदोलनं करून किंवा जोरजबरदस्ती करून हा तिढा सुटणार नाही तर चर्चा करून पटवून देऊन यावर मार्ग काढता येईल असे श्री श्री रवीशंकर म्हणाले. धर्म आणि अध्यात्म भीतीच्या पायावर नसावं, परंतु जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये ही भीती आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.
धार्मिक नेत्यांना माझं सांगणं आहे की, उगाच भयग्रस्त होऊ नका, देव अजिबात रागावणार नाही.
३७७ कलमाबाबत बोलताना रवीशंकर यांनी लैंगिकता हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असल्याचे सांगितले. जर समलैंगिकता हा गुन्हा ठरवला तर आपण शेकडो वर्षे मागं जाऊ असं सांगताना याबाबतीत सुधारणा करण्यासाठी धैर्य आणि बांधिलकीची गरज असल्याचे ते म्हणाले. सुधारकांनी लोकांमध्ये जागृती घडवायला हवी, त्यांना ज्ञान द्यायला हवं. शासक आणि सुधारक या दोघांनी एकत्र येऊन सामाजिक रोगांवर इलाज करायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.