लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीयांना फसवून रशिया- युक्रेनच्या युद्धात पाठविण्याच्या प्रकरणात सीबीआयने चार लोकांना अटक केली आहे. त्यातील तीन जण भारतातील व एक जण रशियातील संरक्षण मंत्रालयात अनुवादक पदावर कार्यरत असलेला कर्मचारी आहे. या सर्वांना गेल्या २४ एप्रिल रोजीच अटक करण्यात आली होती. मात्र, त्याची माहिती आता उजेडात आली आहे.
याप्रकरणी अटक केलेल्या लोकांमध्ये अरुण, येशुदास यांचा समावेश असून ते तिरुवनंतपुरमचे रहिवासी आहेत. तिसरा आरोपी अँथनी एलांगोवन हा मुंबईला राहतो. निजिल जोबी बेनसाम हा रशियातील संरक्षण मंत्रालयात अनुवादक आहे. उत्तम नोकरी व चांगला पगार यांचे आमिष दाखविणाऱ्या जाहिराती सोशल मीडियावर झळकवून हे लोक भारतीयांना जाळ्यात ओढायचे. रशियात बोलावल्यानंतर लोकल एजंटच्या मदतीने त्यांना रशिया-युक्रेनच्या युद्धासाठी रशियाच्या लष्करात भरती केले जायचे.
संरक्षण मंत्रालयातील अनुवादक टोळीचा साथीदारnसीबीआयने यासंदर्भात सांगितले की, रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील अनुवादक निजिल जोबी बेनसाम हा या टोळीचा महत्त्वाचा साथीदार होता. तो भारतीयांना रशियाच्या लष्करामध्ये भरती करण्याचे काम करत होता. nमुंबईतील अँथनी हा दुबईतील आपले साथीदार फैजल बाबा व रशियातील आपल्या दुसऱ्या साथीदारांशी संगनमत करून भारतीयांचे व्हिसा, विमानाचे तिकीट तयार करत असे. अरुण व येशुदास हे स्थानिक एजंट होते.
अशी होते फसवणूक; कंपन्या करतात काय?युद्धामुळे कोसळलेल्या इमारती, त्यांचे ढिगारे उपसण्याच्या कामासाठी कर्मचारी हवेत, असे सांगितले जाते. ही नोकरी करणाऱ्याला दरमहा १ लाख रुपये पगार मिळणार असून त्यांना सीमेवर लढाई करण्यासाठी पाठविले जाणार नाही, असे आश्वासनही दिलेले असते. मात्र, प्रत्यक्षात रशियात पोहोचल्यावर या लोकांना युद्धात लढण्यासाठी पाठविले जाते.