नवी दिल्लीः दोन तरुणांनी अल्पवयीन मुलीबरोबर सहमतीनं केलेला सेक्स गुन्हाच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीतल्या एका कनिष्ठ न्यायालयानं दिला आहे. 15 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीबरोबर मैत्री केल्यानंतर दोन तरुणांनी तिच्याबरोबर दुष्कृत्य केलं. या प्रकरणात न्यायालयानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं आहे.न्यायाधीश उमेद सिंह ग्रेवाल यांनी दोन्ही आरोपी परवेश राणा (30) आणि आशीष सेहरावत (41) यांना दोषी ठरवत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्या आरोपींनी मुलीच्या सहमतीनं संबंध ठेवल्याचा न्यायालयात दावा केला होता. त्यानंतरही न्यायालयानं अल्पवयीन मुलीच्या सहमतीनं शारीरिक संबंध ठेवला तरी तो गुन्हाच ठरणार असल्याचा निर्वाळा दिला होता. कलम 375 अंतर्गत 16 वर्षांहून कमी वयाच्या अल्पवयीन मुलीबरोबर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास ते दुष्कृत्यच ठरतं. या प्रकरणात दोषी ठरवलेल्या परवेश राणा यानं गेल्या 6 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे आणि आशिष जवळपास साडेपाच वर्षं तुरुंगवासात होता. या आरोपींनी आधीच तुरुंगवास भोगला असल्यानं न्यायालयानं आधीच्या शिक्षेएवढी शिक्षा त्या दोषींना दिली आहे.तसेच राणाला 40 हजार आणि सेहरावत यांना 60 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यातील 80 टक्के रक्कम भरपाईच्या स्वरूपात पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. 2009मध्ये या आरोपींनी हे दुष्कृत्य केलं होतं. या प्रकरणात इतर दोन आरोपी गुलशन आणि अमितला न्यायालयानं आरोपमुक्त केलं आहे. पीडितेनं आपल्या जबाबात या दोघांनीही माझ्याबरोबर कोणताही चुकीचा प्रकार केला नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर न्यायालयानं अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या आरोपांतून गुलशन आणि अमितची मुक्तता केली होती.
अल्पवयीन मुलीसोबत सहमतीनं सेक्स केल्यास गुन्हाच, न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 7:47 AM