मुंबई - भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील वादात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, चीनला एकप्रकारे इशाराच दिला आहे. गडकरी यांनी नागपूरमध्ये राजस्थान जनसंवाद रॅलीला संबोधित करताना चीन आणि पाकिस्तानसाठी चांगलाच संदेश दिला. आम्ही कुणावरही आक्रमण करू इच्छित नाही, पण आमच्या सीमारेषांवर कुणी नजर ठेऊन असेल, तर त्याच भाषेत उत्तर द्यायचं आम्हाला ठाऊक आहे, असे म्हणत गडकरी यांनी चीनवर निशाणा साधला.
गडकरी यानी नागपुरातून भाजपाच्या वर्च्युअल रॅलीला संबोधित करताना, आम्ही विस्तारवादी नसून कुठल्याही देशातील दहशतवादाचं समर्थन करत नाहीत. शांती आणि अहिंसा या तत्वानुसार आम्ही काम करतो. मात्र, शक्तिशाली असल्यानंतरच आपल्या देशातील नागरिकांमध्ये शांती आणि सुरक्षा स्थापन केली जाऊ शकते, असे मला वाटते. त्यामुळेच, आम्ही भारताला बलशाली राष्ट्र बनवत आहोत, असेही गडकरी यांनी म्हटले. आम्ही भुताना आणि नेपाळसारख्या लहान देशांकडे नजर वर करुनही कधी पाहिले नाही. आम्ही बांग्लादेशची एक इंचही जमिन बळकावली नसून बांग्लादेशला स्वतंत्र राष्ट्र बनवले आहे. आम्ही कुणाचीही जमिन हडप करु इच्छित नाही, पण कुणी आमच्या जमिनीकडे डोळे वर करुन पाहिलं, तर आम्ही ते डोळे काढून घ्यायची क्षमता ठेवतो, असा सज्जड दमच गडकरींनी दिला आहे.
पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. त्यातच आता गलवान नदीच्या खोऱ्यातील चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्यानं संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. गलवान नदीच्या खोऱ्यात अनेक ठिकाणी तंबू उभारण्यात आल्याचं उपग्रहांमधून टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमधून दिसून येत आहे. त्यामुळे या भागात चिनी सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचं सिद्ध झालं आहे. नऊ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी लष्कराचे किमान १६ कॅम्प आहेत. त्यामुळे चीन मागे हटायला तयार नसल्याचं स्पष्ट दिसतं आहे. उलट चीननं या भागातील सैनिकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे भारतीय जवानांना असलेला धोका वाढला आहे. एनडीटीव्हीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. २२ जूनला भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यामध्ये पूर्व लडाखमधील वादग्रस्त भागातील तणाव निवळण्यासाठी सैन्य मागे घेण्याबद्दल एकमत झालं. दरम्यान, भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यात सुरू असलेला संघर्ष, हे केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचं अपयश आहे, असे म्हणता येणार नाही, असे निसंदिग्धपणे सांगून राष्ट्राच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या आरोपाचे समर्थन करण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र, चीनने १९६२ नंतर भारताचा ३६ हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतला, हे सत्य आहे आणि याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते. गलवान परिसरात भारत रस्ता तयार करतोय. सियाचीन भागातील दळण-वळणासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर चीनचे सैन्य घुसखोरी करत आहे. अशा घटना वारंवार घडतात; परंतु १९९३ मध्ये मी संरक्षणमंत्री असताना या परिसरात दोन्ही सैन्यांनी शस्त्राचा वापर करायचा नाही, असा करार केला होता. सध्याच्या परिस्थितीत देखील कुठेही दोन्ही देशांच्या सैनिकांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेले नाही. हाणामारीचे प्रकार घडले, असेही पवार यांनी म्हटले.