मांजरीला कोंडून घातले, तर ती तुमच्यावर हल्ला करणारच!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 06:21 AM2024-04-19T06:21:09+5:302024-04-19T06:21:24+5:30
सर्वपक्षीय स्त्री खासदारांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री! या प्रकल्पात मध्य प्रदेशातील सिधी येथील खासदार रीती पाठक यांच्याशी झालेल्या गप्पांचा सारांश.
शायना एन. सी. भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या
पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही कामाला सुरुवात केली आणि दोनदा सिधी मतदारसंघातून लोकसभेत गेलात. कसा झाला हा प्रवास? सिंगरौली जिल्ह्यातील खटकळी या अगदी छोट्या गावात मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. वडील वकिली करतात. मीही एम.ए.,एलएल.बी. केले. लग्नानंतर मी १४ वर्षे मिझोरममध्ये काम केले. तिकडून आल्यावर पती रजनीश यांच्या प्रेरणेतून मी ग्रामीण भागासाठी काम करायचे ठरवले. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन मी पंचायत समितीत काम करू लागले. शाळा, कॉलेजच्या दिवसांपासून चुकीच्या गोष्टींविरुद्ध मी सतत आवाज उठवत आले.
आमच्या कॉलेजच्या रस्त्यावर एक देऊळ होते. तिथे एक म्हातारी अम्मा बसलेली असायची. नजरानजर झाली की, आम्ही दोघी ओळखीचे हसायचो. एकदा तिने मला बोलावून एक मळकट कागद हातात ठेवून म्हटले, ‘मला एक चिट्ठी लिहून देशील?’
‘आपल्याला वृद्धांसाठीची पेन्शन मिळावी. अन्यथा दोनवेळची भाकरी मिळण्याची मारामार असल्याने मला मरण पत्करावे लागेल’, असा अर्ज तिला स्थानिक नेत्यांकडे करावयाचा होता. मी लिहून दिलेला अर्ज तिने नेत्याच्या घरी जाऊन चौकीदारापाशी दिला आणि ती उत्तराची वाट पाहत राहिली. कॉलेजची सुट्टी संपून मी परत आले तेव्हा मला अम्मा तेथे दिसेना. बाजूच्या फुलवाल्याने सांगितले, काही दिवसांपूर्वी मंदिराच्या पायऱ्यांवरच तिने उपाशीपोटी प्राण सोडला होता.
या अम्मांमुळे तुम्ही राजकारणात आलात? कदाचित, होय. कुठलाही प्रश्न समोर आला, की त्याच्या मुळाशी जाऊन तो सोडवणे हा माझा बालपणापासूनचा स्वभाव होता. अर्थात, लहानपणी आपली अनेक स्वप्नं असतात आणि ती बदलतही जातात. राजकारणाबदल मला काही फारशी रुची नव्हती तरी मिझोराममध्ये १४ वर्षे राहून आल्यावर मी तिकडे वळले. संकुचित मनोवृत्तीच्या लोकांनी तोंडावर किंवा पाठीमागे असभ्य भाषा वापरली. ती झेलावी लागली. सार्वजनिक क्षेत्रातल्या स्त्रियांना या अशा मानसिकतेच्या लोकांशी लढावे लागतेच.
एक महिला सक्षम होऊन संसदेत प्रश्न विचारते हे लोकांना पचत नाही, असे वाटते का? मी मांजरीचे उदाहरण देईन. तिला तुम्ही बिनबोभाट जाऊ दिले तर ठीक; पण अडवले, कोंडून घातले तर ती हल्ला करते. महिला सालस, जबाबदार, प्रामाणिक असतात, तरी लोक अपशब्द वापरून त्यांना कमी लेखतात; पण व्यवस्था समजून घेऊन ती सुधारण्याचे काम महिलाच उत्तम करू शकतात. मग राजकीय व्यवस्था असो, सामाजिक, कौटुंबिक असो; देशाची असो किंवा विश्वाची!
ग्रामीण महिलांना राजकारणाबद्दल काय सांगाल?
तुम्हाला राजकारण करावयाचे आहे की, राजकारणाच्या माध्यमातून काही चांगली कामे करावयाची आहेत?- हे आधी समजून घेतले पाहिजे. विकासाची कामे करायची असतील तर पदर खोचून कामाला लागा. पक्ष- संघटना ही तुम्हाला ताकद देणारे माध्यम असते. माझ्या प्रवासात संघटनेला मी मोठे श्रेय देते. माझ्या मतदारसंघातील महिलांसाठी जर मी आदर्शवत ठरत असेन तर या सर्व माता-भगिनींचे, मुलींचे मी स्वागतच करीन. नेतृत्वाकडे सेवाभाव असेल तर काय फरक पडतो?
नेता सेवाभावी असेल तर फरक पडतोच. सिधी या माझ्या मतदारसंघात पूर्वी कच्ची घरे होती; आता ती पक्की झालेली दिसतात. प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा प्रत्येक गरिबाला झाला. गरिबांच्या स्वयंपाकघरात गॅस आला. ‘आयुष्मान भारत’मुळे आरोग्याचे प्रश्न सोपे झाले. महिलांनी राजकारणात यावे की येऊ नये? राजकारण भले माध्यम असेल; पण समाजासाठी काही केले पाहिजे. महिलांनी राजकारणात आलेच पाहिजे. व्यवस्था बदलणे, बरे-वाईट ओळखणे याची विशेष क्षमता स्त्रियांकडे असते. देशहितासाठी ती वापरायलाच हवी.