- संजय शर्मा
नवी दिल्ली : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पार्टीच्या खासदारांकडे पक्ष नेतृत्वाने जनसंपर्क अभियानांतर्गत भेटलेल्या एक हजार लोकांच्या नावांची यादी मागितली आहे. त्याचबरोबर २५ जून रोजी आणीबाणीची आठवण लोकांना देण्यासाठी आणीबाणीच्या काळात करण्यात आलेल्या अत्याचारावरील चित्रपट जनतेला दाखवण्यास सांगितले आहे.
मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपने ३० मे ते ३० जूनपर्यंत देशभरात जनसंपर्क अभियान सुरू करण्याची घोषणा केली होती. हे अभियान समाप्त होण्याच्या आठ दिवस आधीच भाजप खासदार व केंद्रीय मंत्र्यांना हिशेब मागितला जात आहे. त्यांनी या कालावधीत समाजातील कोणत्या एक हजार प्रभावशाली प्रतिष्ठित लोकांशी संपर्क साधला, याबाबत माहिती विचारण्यात आली आहे.आणीबाणीची आठवण देण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांत भाजप खासदार, नेत्यांना आणीबाणीत झालेल्या अत्याचारावरील चित्रपट दाखविण्यास सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान २७ रोजी व्हर्च्युअल संवाद साधणार- भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सर्व खासदार, केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी एक हजार लोकांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. - या अभियानाचे अपयश पाहता, भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्र्यांनी संपर्क साधलेल्या एक हजार लोकांची यादी मागण्यात आली आहे. - भाजपच्या देशभरातील बुथ कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जून रोजी व्हर्च्युअल संवाद साधणार आहेत. - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवड झालेल्या सोशल मीडियाला प्रभावित करणाऱ्या तीन हजार कार्यकर्त्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. - हा व्हर्च्युअल संवाद पाहण्यासाठी भाजपच्या १५ हजार मंडळांत स्क्रीन लावला जाईल. तेथे भाजप खासदार, आमदार व नेत्यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.