ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांना फटकारलं असून 600 कोटी भरा अन्यथा जेलमध्ये जा असे खडे बोल सुनावले आहेत. पैसे जमा करण्यासाठी सुब्रतो रॉय यांना न्यायालयाने 6 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. 600 कोटी जमा करण्यासाठी अजून मुदत मिळावी अशी याचिका सहारा समूहाकडून करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळत पैसे भरा अन्यथा जेलमध्ये जा असं म्हटलं आहे.
नोटाबंदीमुळे पैसे जमा करण्यात समस्या निर्माण होत आहे असा दावा सहारा समूहाकडून न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने हा दावा फेटाळत पैसे जमा न केल्यास सुब्रतो रॉय यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी करण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या सुनावणीत न्यायालयाने पैसे जमा करण्यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती.
नोटाबंदीमुळे पैसे जमा करणं शक्य होत नसल्याने आम्हाला अजून वेळ देण्यात यावा अशी याचिका सहारा समूहाने केली होती. नोटाबंदीमुळे संपत्ती विकण्यातही अडथळे येत असल्याचा दावा सहारा समूहाकडून करण्यात आला जो न्यायालयाने फेटाळला. 28 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांना जेलबाहेर राहायचं असेल तर 6 फेूब्रुवारीपर्यंत 600 कोटी जमा करण्याचे आदेश दिले होते.