गाझीपूर : मतदारांसह विरोधी पक्षांना धमक्या देण्याचे सत्र सुरुच असून निवडणूक आयोगाच्या योगी, मायावती यांच्यावरील कारवाईचा कोणताही परिणाम जाणवत नाहीय. केंद्रातील मोदी सरकारच्या एका मंत्र्याने जाहीर सभेत भाजपा कार्यकर्त्यांकडे कोणी डोळे वटारून पाहिल्यास त्याचे डोळे फोडण्याची आणि बोट दाखवल्यास बोटच तोडण्याची उघडउघड धमकी दिली आहे.
गाझीपूरमध्ये गुरुवारी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. भाजपाचे कार्यकर्ता गुन्हे आणि भ्रष्टाचाराला मुळापासून उखडण्यासाठी तयार आहेत. जर त्यांच्यावर कोणीही बोट दाखवल्यास त्याचे बोट पुढील 4 तासांत धड राहणार नाही याची ग्वाही देतो, अशी धमकीच देऊन टाकली.
यावरच न थांबता त्यांनी डोळे फोडण्याचे वक्तव्य केले आहे. कोणी पुर्वांचलचा गुन्हेगार ज्याची गाझीपूरची सीमा ओलांडण्याची लायकी नाही. त्याने येऊन कार्यकर्त्यांशी नजर भिडवल्यास त्याचा डोळा धड राहणार नाही, अशी धमकी दिली आहे.
निवडणूक आयोगाने बसपाच्या मायावती, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सपाचे आझम खान आणि भाजपाच्या केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यावर प्रचारबंदीचा कारवाई केली होती. मात्र, या कारवाईचा धसका या राजकीय नेत्यांनी घेतला नसल्याचे मनोज सिन्हा यांच्या वक्तव्यांवरून दिसत आहे.