पणजी : वेतनासाठी महिन्याभरापासून आंदोलन करणाऱ्या परिचारिकांच्या फिर्यादीची दखल घेण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची एकप्रकारे टर उडवणारे वक्तव्य केल्याने गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बुधवारी वादाच्या भोवऱ्यात अडकले. ‘उन्हात बसलात तर काळ््या व्हाल, मग तुम्हाला लग्नासाठी नवराही मिळणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्याचा दावा परिचारिका संघटनेने केला मात्र आपण अशा प्रकारचे अपशब्द वापरले नसल्याचे पार्सेकर यांचे म्हणणे आहे.‘१०८’ या रुग्णवाहिका सेवेतील कर्मचारी वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी महिन्यापासून आंदोलन करत आहेत. आझाद मैदानात ते भरउन्हात रोज ठिय्या आंदोलन करत आहेत. यापूर्वी ११ आंदोलकांना ‘इएमआरआय’ कंपनीच्या व्यवस्थापनाने बडतर्फ केले आहे. मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक कार्यक्रमात घेराव घालण्याचे आंदोलकांनी ठरविले आहे. पार्सेकर मंगळवारी उसगाव-धारबांदोडा येथे एका कार्यक्रमास गेले असता, रुग्णवाहिका सेवेच्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांरी त्यांना भेटले. तेव्हा तुम्ही उन्हात बसून काळे व्हाल, असे विधान त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना उद्देशून केल्याने वादाची ठिणगी पडली. पार्सेकर यांनी त्याचा इन्कार केला. आंदोलकांच्या नेत्यांनी उगाच वाट्टेल ती वाक्ये माझ्या तोंडात घातली आहेत. आपण जे बोललोच नाही, ते बोलल्याचे सांगत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
उन्हात बसलात तर काळ्या व्हाल !
By admin | Published: April 02, 2015 2:52 AM