विशाखापट्टणम : केंद्रातील मोदी सरकार बालाकोट एअरस्ट्राईकचे श्रेय घेण्यास तात्काळ पुढे येत असेल, तर या सरकारने जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील अतिरेकी हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) म्हटले आहे.टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते दिनकर लंका यांनी म्हटले आहे की, सीआरपीएफच्या वाहनांना बुलेटप्रूफ कवच देण्यात मोदी सरकार अयशस्वी झाले आहे. त्यामुळेच १४ फेब्रुवारी रोजी झालेला हल्ला आपण रोखू शकलो नाही व ४० जवान शहीद झाले.
या हल्ल्याला सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी सीआरपीएफच्या बुलेटप्रूफ बसचे उद्घाटन केले. अशा प्रकारची २०० वाहने संरक्षण मंत्रालयाकडे असताना ती वाहने अद्याप जवानांना का दिली गेली नाहीत? या बसेस कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. या सरकारला बालाकोट एअरस्ट्राईकचे श्रेय घ्यायचे असेल, तर जवानांना सुरक्षा पुरवण्यात कमी पडल्याची जबाबदारीही घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. यंदा निवडणुकीच्या मैदानात एकट्याने उतरणे टीडीपीला महागात पडेल का, या प्रश्नाच्या उत्तरात दिनकर लंका म्हणाले की, उलट याचा आम्हाला फायदा होईल. २००४ मध्ये भाजप बरोबर असल्याने आम्हाला अल्पसंख्यकांची मते गमवावी लागली होती. मात्र यंदा स्वतंत्र लढत असल्याने आमच्या मतात निश्चितच वाढ होईल, असेही ते म्हणाले.किंगमेकरच्या भूमिकेसाठी तयारीतेलगू देसम पार्टीला आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २० जागा मिळतील व आम्ही केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावू, असा दावाही लंका यांनी केला. टीडीपीने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत १५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी या पक्षाबरोबर भाजप व अभिनय क्षेत्रातून राजकारणात उतरलेले पवन कल्याण हेही होते. केंद्रात किंगमेकरची भूमिका बजावण्याच्या तयारीत असलेले टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षांना एकत्रित करीत असून, संपूर्ण देशाचा दौरा करीत आहेत.