ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - भूसंपादन व भ्रष्टाचारावरुन आम्ही सत्ताधा-यांविरोधात उभे राहिलो, सत्ताधा-यांनी आम्हाला संसेदतून बाहेर फेकले तरी चालेल पण आम्ही माघार घेणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मन की बात करणा-या पंतप्रधानांनी एकदा देशवासीयांच्या मन की बात ऐकावी असेही त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या २५ गोंधळी खासदारांना निलंबित केले होते. याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून मंगळवारी काँग्रेसने संसद परिसरात धरणे आंदोलन केले. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी आदी दिग्गज नेते या आंदोलनात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष या पक्षांचे खासदारही आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारवर टीका करताना सोनिया गांधी म्हणाल्या, संसद चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे, खासदारांना निलंबित करत सरकारने लोकशाहीची हत्या केली. तर राहुल गांधी यांनी आक्रमक शैलीत मोदी सरकारवर निशाणा साधला.
काँग्रेस खासदारांसोबत जे झाले ते फक्त एक उदाहरण आहे, देशातील विद्यार्थी, शेतकरी वर्ग इतकेच नव्हे तर इंटरनेटवरही मुस्कटदाबी केली जात आहे असा आरोप राहुल गांधींनी केला. ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे, वसुंधरा राजे व ललित मोदींचे आर्थिक हितसंबंधही उघड झालेत. व्यापम घोटाळ्याने मध्य प्रदेशमधील लाखो तरुणांचे भविष्य उद्धवस्त केले असे राहुल गांधींनी सांगितले. तिन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहोत असे त्यांनी सांगितले. काँग्रेसला किंवा मला राजीनामा नको आहे, आता देशातील जनतेलाच राजीनामा हवा आहे असेही त्यांनी नमूद केले.