कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बेलूर मठालाही भेट दिली. तत्पूर्वी मतता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सीएए आणि एनआरसीवर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच हा कायदा मागे घेण्याची मागणी केली. यानंतर ममता यांनी सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी त्यांनी आंदोलकांना संबोधित करताना, मी पंतप्रधानांकडून अन्य कार्यक्रमांना निमंत्रण देण्यात आले होते. त्या कार्यक्रमांना जाणे टाळले. मात्र, प्रोटोकॉल असल्यामुळे मिलेनियम पार्कमध्ये मला त्यांची भेट घ्यावी लागली. यावेळी मी त्यांना सीएए आणि एनआरसी कायदा रद्द करण्याची मागणी केली. तसेच जर हा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करायचा असेल तर माझ्या मृतदेहावरून आधी जावे लागेल अशा शब्दांत ठणकावून सांगितल्याचे म्हणाल्या.
मी सीएएची अधिसूचना पाहिली आणि फाडून टाकल्याचेही त्यांनी तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
दरम्यान, मोदी यांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमाला भेट दिली. यानंतर ते बोटीमधून बेलूर मठाकडे निघाले. यावेळी त्यांनी मठाच्या संतांचे आशिर्वाद घेतले.