ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. १७ - पुढच्यावर्षी होणा-या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमदेवारांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोशल मिडीयावर सक्रीय रहाण्याची सूचना केली आहे. इच्छुक उमेदवारांना सोशल मिडीयावर २५ हजार फॉलोअर्स किंवा लाईक असले पाहिजेत. तिकीट वाटपात सोशल मिडीयावरील सक्रीयता महत्वाचा निकष असेल असे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
फेसबुक, टि्वटरचा मर्यादीत वापर किंवा याविषयी माहितीच नसेल तर असे उमेदवार भाजपकडून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत मागे पडणार आहेत. उत्तरप्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी यांची टि्वटरवरील फॉलोअर्सची संख्या फक्त १० हजार आहे. मुझफ्फरनगर दंगलीचा आरोप झालेला शामलीचे भाजप आमदार सुरेश राणा यांचे फेसबुकवर फक्त १२८५६ फॉलोअर्स आहेत.
मेरठचे भाजप खासदार राजेंद्र अग्रवाल यांना फेसबुकवर फक्त १३९५७ लाईक्स आहेत. बिजनौरचे खासदार कुवर भरतेंद्र सिंह यांच्या फेसबुक अकाऊंटवर फॅनपेजच नाही. त्यांना फक्त २९८६ फ्रेंडस आहेत. टि्वटरवर तर ते सक्रीयच नाहीत. आपली पाठिराख्यांची संख्या कमी असली तरी, पुढच्या तीन महिन्यात आपण लक्ष्य गाठू असा विश्वास लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी व्यक्त केला.