नवी दिल्ली - माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशात राबवण्यात येत असलेल्या आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता भाजपाच्या अजून एका ज्येष्ठ नेत्याने मोदींवर टीकास्र सोडले आहे. मोदींनी समोर येत प्रसारमाध्यमांना सामोरे जाऊन प्रश्नांची खुलेपणाने उत्तरे देण्याची वेळ आली आहे, असे आव्हान भाजपाचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींना दिले आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले," आपण मध्यमवर्गीय, निर्यातक, लहान व्यापारी, तसेच संपूर्ण देश विशेषकरून गुजरातमधील नागरिकांची चिंता करतो, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी दाखवले पाहिजे." यशवंत सिन्हा यांनी केलेल्या टिप्पणीला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शेलक्या शब्दात दिलेल्या उत्तरानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी हे वक्तव्य केले आहे. यशवंत सिन्हा यांच्यावर टीका करणाऱ्या अरुण जेटलींचा शत्रुघ्न सिन्हा यांनी परखड शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, "देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत यशवंत सिन्हा यांच्या निरीक्षणाचे मी आणि माझ्याप्रमाणे विचार असणारे अनेक नेते जोरदार समर्थन करतो. पक्ष आणि पक्षाबाहेरील लोकांनीही त्यांच्या विचारांचे समर्थन केले आहे. येत्या काही दिवसांत नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणार आहे." अगोदरच्या सरकारला आपण दोष देऊ शकत नाही, कारण आपल्याला पुरेपूर संधी मिळाली आहे, असे सांगत यशवंत सिन्हा यांनी भाजपा सरकारला सुनावले होते. 'अर्थव्यवस्था कमकुवत असताना नोटाबंदीचा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती. अजून नोटाबंदीचे परिणाम समोर आले नसताना जीएसटी लागू करणे दुसरा धक्का होता', अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं यशवंत सिन्हा यांनी सांगितले होते. 'अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे यामध्ये काही दुमत नाही. आम्ही नेहमी युपीएला जबाबदार धरत होतो. मात्र आता जेव्हा सत्तेत येऊन 40 महिने झाले आहेत, त्यानंतरही आधीच्या सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही', असे खडे बोल यशवंत सिन्हा यांनी सुनावले होते.त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना उत्तर देताना 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत अशी खोचक टीका केली होती. यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज आहेत त्या ठिकाणी नसते असे म्हटले होते. देशाची अर्थव्यवस्था ढासळत असल्याला अरुण जेटली जबाबदार आहेत, असं यशवंत सिन्हा बोलले होते. उत्तर देताना अरुण जेटली बोलले होते की, 'यशवंत सिन्हा 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत. मी अद्याप तरी अशा स्थितीत नाही की माजी अर्थमंत्री म्हणून वृत्तपत्रात लेख लिहीन'.
तर खुल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सामोरे जा, शत्रुघ्न सिन्हांचे मोदींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 10:28 PM