नवी दिल्ली, दि. 12 - सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत आणि चीनमध्ये 73 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष मागच्या महिन्यात संपुष्टात आला. दोन्ही देशांचे सैन्य परस्परापरस्परांसमोर उभे ठाकले होते. भारत आणि चीनने सैन्य मागे घेतल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आता पूर्ववत होत आहेत. पण भविष्यात पुन्हा असा संघर्ष उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारताला रणनितीक मार्गदर्शन करणा-या सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने भारताला लष्करी क्षमता वाढवण्याचा सल्ला दिला आहे.
दशकभरापूर्वी संरक्षण मंत्रालयाने सीईएनजेओडब्ल्यूएसची स्थापना केली. वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे. कारण चीन ताकतीचा आदर करतो असे सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने म्हटले आहे. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा जिथे मिळते त्या ट्राय जंक्शनवर चीनने रस्ता बांधणी सुरु करुन परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे डोकलामचा संघर्ष उदभवला. खरतर डोकलाम भूतानच्या हद्दीत येते. पण चीनला परस्पर 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा अधिकार नाही. कारण चीनच्या रस्ता बांधणीमुळे भारताच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होणार होता. यापूर्वी 2014 मध्ये चुमार आणि 2013 साली डेपसांगमध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते. सीईएनजेओडब्ल्यूएसने आपल्या अहवालात भारत-चीनसीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे कामही वेगाने करण्याची शिफारस केली आहे.
मध्यंतरी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे वक्तव्य केले होते. रावत यांचे हे विधान चीनच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. भारताला एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध परवडणार नसल्याचे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले होते. जनरलनी नीट माहिती घेतली पाहिजे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध सुरु झाले तर, भारत परिणाम सहन करु शकेल का ? असे लेखात म्हटले होते. आम्ही पहिल्यांदा परिस्थिती चिघळेल अशी कृती करणार नाही आणि भारतालाही करु देणार नाही असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले होते.