लखनौ - मुस्लिम समाजामध्ये पवित्र मानला जाणारा बकरी ईदचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. यंदाच्या बकरी ईदच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत भाजपाचे गाझियाबादमधील लोनी मतदारसंघाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी बकरी ईदला दिल्या जाणाऱ्या कुर्बानीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘’कोरोनामुळे कुर्बानी देण्यात येऊ नये. कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या मुलांची द्या.’’ दरम्यान, कुर्बानी देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर पुढे म्हणाले की, ‘’सनातन धर्मामध्ये पूर्वी बळी दिला जात असे. मात्र आता नारळ फोडून त्याद्वारे बळीची पूर्तता केली जाते. बकरा कापला जात नाही. त्याप्रकारेच माझे इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या पवित्र गोष्टीला, आपल्या मुलांचा बळी देत नाही. आता जर कुणी म्हणत असेल की, मला कुर्बानी द्यायची आहे तर अशा व्यक्तीने आपल्या मुलाचा बळी द्यावा. जी व्यक्ती मुक्या जीवाचा बळी देईल. तिला पुढचा जन्म बकऱ्याचा मिळेल आणि त्याला लोक मारून खातील. हाच निसर्गाचा नियम आहे.’’
दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सरकारकडून सातत्याने धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बकरी ईद तसेच इतर सामाजिक कार्यक्रमही टाळण्यात यावे, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, सपाचे संभलमधील खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी आपल्या नमाज पढण्यावर कुणीही बंदी घालू शकत नाही असे विधान केले होते. बकरी ईद हा मुस्लिमांचा मोठा सण आहे. त्यातच जनावरांचा बाजार सुरू झालेला नाही. अशा परिस्थितीत सण कसा साजरा होईल, अशी बंदी घालणे योग्य नाही.
दरम्यान, शफीकुर्रहमान यांना भाजपा आमदार संगीत सोम यांनी धमकी दिली आहे. जर सपा खासदार शफीकुर्रहमान ऐकले नाहीत तर ज्याप्रमाणे आझम खान यांची ईद तुरुंगात साजरी झाली तशी तशीच त्यांची बकरी ईद तुरुंगात साजरी होईल, असा इशारा दिला आहे.