ऑनलाइन लोकमत -
शिमला, दि. ४ - बीसीसीआयला धरमशालामध्ये भारत - पाकिस्तान क्रिकेट मॅच खेळवायची असले तर आधी त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी मसुद अजहरच मुंडकं आणावं, असं वक्तव्य माजी सैनिक मेजर विजय सिंग मनकोटीया यांनी केलं आहे. या क्रिकेट मॅचविरोधात आम्ही 'ऑपरेशन बलिदान'देखील सुरु करणार आहोत अशी माहिती विजय सिंग मनकोटीया यांनी दिली आहे. विजय सिंग मनकोटीया हे काँग्रेसचे माजी मंत्रीदेखील आहेत.
टाईम्स नाऊला दिलेल्या वृत्ताप्रमाणे गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार 7000 पाकिस्तानी नागरिक ही क्रिकेट मॅच पाहण्यासाठी काश्मीरमार्गे धरमाशाला येथे येऊ शकतात. क्रिकेट मॅचदरम्यान जेव्हा पाकिस्तानचा झेंडा फडकावला जाईल तेव्हा परिस्थिती बिघडू शकते असा इशारा विजय सिंग मनकोटीया यांनी दिला आहे.
भारतीय माजी सैनिक लीगची 10 मार्चला बैठक होणार आहे ज्यामध्ये पुढील रणनीती ठरवली जाईल. जर दहशतवाद आणि चर्चा एकत्र एनडीएला चालत नाही तर मग दहशतवाद आणि टी20 कसं चालत ?. जरी शहीदांच्या कुटुंबांनी या क्रिकेट मॅचसाठी संमती दर्शवली तरी आमचा विरोध कायम राहणार असल्याचंदेखील विजय सिंग मनकोटीया यांनी सांगितलं आहे.
19 मार्चला टी20 वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान क्रिकेट मॅच हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी अगोदरच केंद्राला पत्र लिहून या मॅचसाठी सुरक्षा देण्यासाठी आम्ही असमर्थ असल्याचं सांगितलं आहे. मात्र हिमाचल प्रदेश क्रिकेट असोससिएशनने मॅच दुसरीकडे घेण्यास नकार दिला असल्याने राज्यात सध्या तणावाचं वातावरण आहे.