रामल्ला/नवी दिल्ली:पॅलेस्टाइनमधील (Palestine) भारतीय राजदूत मुकुल आर्य (Mukul Arya) यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. पॅलेस्टाइनच्या रामल्ला येथील भारतीय दूतावासात त्यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुकुल आर्य यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, आर्य यांचा मृत्यू कशामुळे झाला, त्याबाबत अधिक माहिती समोर आली नाही.
पॅलेस्टाईनच्या सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुकूल आर्य यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की, काही घातपात, याचा तपास केला जातोय. त्याबद्दलची सविस्तर माहिती लवकरच मिळेल. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनीच मुकूल आर्य यांच्या निधनाचे वृत्त ट्विटरवरुन दिले. ते म्हणाले- ''भारताचे रामल्लामधले प्रतिनिधी मुकूल आर्य यांच्या निधनाने धक्का बसला. ते एक हुशार आणि तेजस्वी अधिकारी होते. त्यांचे कुटूंब आणि नातेवाईकांप्रती माझी सहवेदना.''
पॅलेस्टाईन सरकारचे चौकशीचे आदेशमुकूल आर्य यांचा मृतदेह रामल्लामधील भारतीय दुतावासात आढळून आला. त्यांच्या निधनानंतर राष्ट्राध्यक्ष महमुद अब्बास आणि पंतप्रधान मुहम्मद शतेह यांनी पोलीस प्रशासन तसच सुरक्षा अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना तातडीने राजदूतांच्या घरी पाठवण्याच्या सूचना दिल्या. तसेच, निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. आर्य यांचे पार्थिव शरीर भारतात पाठवण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली जात आहे.
कोण होते मुकूल आर्य?मुकूल आर्य 2008 बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी होते. ते सध्या पॅलेस्टाईनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहायचे. याआधी त्यांनी रशिया आणि अफगाणिस्तानच्या भारतीय दुतावासात काम केले आहे. यूनेस्कोमध्ये ते भारताचे प्रतिनिधी होते. त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यानंतर भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले.