‘इंडिया’ नावावरून विरोधी आघाडीतील नितीशकुमारांची उपेक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 06:08 AM2023-07-20T06:08:43+5:302023-07-20T06:09:15+5:30
विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्याचा विचार नितीशकुमारांचा आहे.
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पाटण्याला परतणे चर्चेचा विषय बनले आहे. प्रत्येकाच्या ओठावर प्रश्न आहे की, नितीशकुमार यांनी हा दुरावा का ठेवला? आघाडीचे नाव ‘इंडिया‘ ठेवण्यावरून त्यांची उपेक्षा झाल्याने त्यांनी काढता पाय घेतला असे मानले जात आहे.
विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्याचा विचार नितीशकुमारांचा आहे. त्यांना विरोधी ऐक्याचे निमंत्रक बनवण्याची आशा होती, पण तसे झाले नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त आघाडीचे नवे नाव ‘इंडिया’ ठेवण्याबाबतही त्यांचे मतभेद झाले. इतर काही पक्षांप्रमाणेच नितीशकुमार यांचा त्याला विरोध होता, परंतु तृणमूल आणि काँग्रेसने ‘इंडिया’ हेच नाव रेटून नेले. आपली उपेक्षा होत आहे, हे पाहून नितीशकुमार यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी मात्र नितीशकुमार नाराज का असतील? त्यांच्या विरोधात दुष्प्रचार केला जात आहे, असे मत व्यक्त केले.