संबलपूर (ओडिशा) : संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वसतिगृहात खोल्या न मिळाल्यामुळे संस्थाच सोडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.आयआयएम-एसच्या चौथ्या तुकडीचे वर्ग गेल्या ३० जुलै रोजी सुरू झाले, त्यावेळी १११ विद्यार्थी होते, आज ते ९९ आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, कारण संस्था काही विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या खोल्या उपलब्ध करून देऊ शकली नाही, असे आयआयएम-एसचे संचालक महादेव जैस्वाल यांनी सांगितले. २०१५ मध्ये आयआयएम-एस सुरू झाली. सुरुवातीला विद्यार्थिसंख्या ६० होती, ती यावर्षी १२० झाली आहे. या संस्थेचे कामकाज संबलपूर विद्यापीठातून सुरू आहे, कारण तिला स्वत:चा कायमस्वरूपी परिसर नाही. जैस्वाल म्हणाले की, सरकारने संबलपूर विद्यापीठ परिसरात आयआयएम-एसच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वसतिगृहे दिली आहेत.सामंजस्य कराराप्रमाणे गेल्या जुलैमध्ये दोन वसतिगृहे उपलब्ध करून देणे आम्ही गृहीत धरले होते; परंतु विद्यापीठ अधिकाºयांनी फक्त एक वसतिगृह आणि दुसºया वसतिगृहाचा निम्मा भाग दिला. त्यामुळे आमच्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले व ते अनेक जण झोपतात अशा खोलीत त्यांना झोपावे लागले. अगदी गेल्या महिन्यापर्यंत विद्यापीठाचे अधिकारी आयआयएम-एसच्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये वसतिगृहात खोल्या उपलब्ध करून देऊ, असे म्हणत होते. आता त्यांनी त्याला नकार दिला आहे. किमान सामंजस्य कराराचे तरी त्यांनी पालन करावे, असे जैस्वाल म्हणाले.
वसतिगृहाअभावी ‘त्यांनी’ सोडले आयआयएम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 11:56 PM