महाकुंभ नगर : महाकुंभ मेळ्यात आयआयटी बाबा अभय सिंह यांचा खूप बोलबाला आहे. आयआयटी मुंबईतून एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी ‘दी लास्ट पेज ऑफ दी नोटबुक’ असा एक प्रकल्प केला. कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये शिकणारे, हॉस्टेलमध्ये राहात असलेल्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या पानावर काय लिहिले जाते याचा अभ्यास करून त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले होते.
२०१४ साली त्यांनी या प्रकल्पाच्या निष्कर्षांत अभय सिंह यांनी म्हटले होते की, विद्यार्थ्यांच्या मनात अनेक सुप्त इच्छा असतात. त्यांची पूर्तता होत नसल्यास त्याबद्दल मनात आलेले विचार शेरेबाजीतून आपल्या वह्यांच्या शेवटच्या पानावर लिहितात. मनातले विचार या पानांवर चित्र काढून व्यक्त करतात. त्यांनी केलेले हे भावनांचे विरेचन असते. अभय सिंह यांना असे आढळले की, वहीची सुरुवातीची पाने संबंधित विषयाच्या नोट्स लिहिण्यासाठी वापरलेली असतात, पण सर्वांत मागच्या पानावरचा मजकूर हा बहुतांश वेळा त्या विषयाशी संबंधित नसतो. (वृत्तसंस्था)
‘मला निघून जाण्यास सांगितले’आयआयटी बाबा अभय सिंह हे महाकुंभ मेळ्यातून जुन्या आखाड्यातील आश्रमातून बेपत्ता झाले अशा आशयाच्या बातम्यांचा त्यांनी इन्कार केला आहे. प्रसारमाध्यमांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या या बाबांची मानसिक स्थिती नीट नाही, असा दावा काही साधूंनी केला होता. तो त्यांनी खोडून काढला आहे. मला आश्रम सोडून जाण्यास सांगितल्याचा दावा आयआयटी बाबांनी केला आहे. मी प्रसिद्ध झालो, हा आमची गुपिते फोडेल अशी आश्रम संचालकांना भीती वाटली, असेही त्यांनी सांगितले.
एअरोस्पेस इंजिनीअरमध्ये उच्चशिक्षणकोटा येथे विद्यार्थी त्यांच्या वहीच्या शेवटच्या पानांवर नेमके काय लिहितात या विषयावर अभय सिंह यांनी वर्षभर अभ्यास केला. आयआयटी इंजिनिअर ते संन्यासी असा प्रवास करणारे अभय सिंह हरयाणातील झज्जर जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत. कोटा येथील कोचिंग क्लासमध्ये शिकावे, अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र, ते दिल्लीमध्ये आले. जेईईमध्ये ७३१वी रँक मिळवून त्यांनी आयआयटी मुंबईत एअरोस्पेस इंजिनिअरिंगमधून पदवी शिक्षण घेतले. ते पहिल्याच फटक्यात जेईई परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी डिझाईनिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.