IIT Baba Mahakumbh 2025 : प्रयागराज येथे आयोजित महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू-संत आले आहेत. यातील अनेक साधू-संत अथवा बाबांची सोशल मीडिया आणि मीडियात चर्चा सुरू आहे. यामध्ये 'IIT बाबा' म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहची सर्वाधिक चर्चा होत आहे. पण, आता हीच चर्चा किंवा लोकप्रियता अभय सिंहला महागात पडली आहे. एका व्हिडिओमध्ये त्याने रडत-रडत आपली आपबीती सांगितली.
आयआयटी बाबाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात अभय सिंह ढसाढसा रडत आपल्यावरील आपबीती सांगतो. अभय म्हणाला की, 'मला आयआयटी बाबाचा टॅग आवडत नाही. मला लोकप्रियता नकोय. आयआयटी बाबाची कहाणी आता थांबली पाहिजे. मी ज्या गोष्टी मागे टाकल्या, जे लोक मागे टाकले, तेच आता पुन्हा माझ्याशी जोडले जात आहेत. ते माझ्या नावाला आयआयटी आणि बाबा जोडत आहेत, मी बाबा नाही,' अशी प्रतिक्रिया अभय सिंहने दिली.
अभय सिंह पुढे म्हणतो, 'मला शो ऑफ अजिबात आवडत नाही, माझा शो ऑफवर विश्वास नाही. माझे कुटुंबीय लोकांना सांगायचे की, आमचा मुलगा आयआयटी मुंबईत आहे, पण मी कधीच कोणाला सांगितले नाही. प्रसिद्ध होण्यापूर्वी मी प्रयागराजमध्ये होतो. त्यावेळी मी कुठेही बसायचो, कोणाशीही बोलायचो, आरामात खायचो-प्यायचो, तेव्हा माझ्याकडे कुणी लक्ष दिले नाही. आता हे सर्व अवघड झालंय.'
'लोकप्रियता माझ्यासाठी आता ओझे बनली आहे. मला फक्त माझा आध्यात्मिक प्रवास चालू ठेवायचा आहे. 'आयआयटी बाबा'ची गोष्ट आता थांबली पाहिजे. परिपूर्णता मिळविण्यासाठी जबाबदारीपासून मुक्त होणे आवश्यक आहे. मला कोणाचेही लक्ष वेधून न घेता, शांततेने आपले ध्यान चालू ठेवायचे आहे. मला फक्त शांतता हवी. महाकुंभात शांतता कशी नांदेल, हे त्या देवालाच माहीत,' असंही अभय सिंह यावेळी म्हणाला.
कोण आहे अभय सिंह उर्फ आयआयटी बाबा?अभय सिंह हा मूळ हरियाणाचा रहिवासी असून, त्याने IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. शिक्षण झाल्यानंतर त्याने काही काळ कॅनडात लाखो रुपये पगाराची नोकरी केली. यादरम्यान त्याने फोटोग्राफी शिकली आणि त्यातही काही काळ काम केले. फोटोग्राफीसाठी देशभर फिरताना तो आध्यात्माकडे ओढला गेला. यानंतर त्याने घरदार सोडून संन्यासी जीवन जगण्याचे ठरवले. त्याने देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. काही दिवसांपूर्वीच तो जूना आखाड्यासोबत कुंभमेळ्यात सहभागी झाला होता. काही दिवसांपूर्वी मीडियाने अभयच्या मुलाखती घेतल्या आणि त्याला देशभर लोकप्रिय करुन टाकले. पण, आता हीच लोकप्रियता त्याच्यासाठी सर्वात मोठी अडचण बनली आहे.