Landslide at Lothal Archaeological Site : गुजरातमधील लोथल येथे संशोधनासाठी गेलेल्या आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी विद्यार्थीनी हडप्पाच्या जागेवरून मातीचे नमुने घेत होती. घटनेच्या वेळी तिच्यासोबत एक महिला प्राध्यापकही होती. दोघेही १० फूट खोल खड्ड्यात उतरले होते. त्यानंतर माती खचू लागली. त्यानंतर मातीखाली दबून विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महिला प्राध्यापक गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
अहमदाबादच्या ढोलका तालुक्यात असलेल्या लोथल पुरातत्व स्थळावर एक दुःखद घटना उघडकीस आली आहे. संशोधन स्थळावर भूस्खलन झाल्याने दोन भूवैज्ञानिक ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. दोन महिला भूवैज्ञानिकांपैकी सुरभी वर्मा या विद्यार्थिनीला आपला जीव गमावावा लागला आहे. दरम्यान, महिला प्राध्यापिका बचावली असून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अहमदाबादपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेले लोथल हे हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण मानले जाते. आयआयटी गांधीनगर आणि आयआयटी दिल्लीचे चार सदस्यांचे पथक संशोधनाच्या उद्देशाने या ऐतिहासिक ठिकाणी गेले होते. २४ वर्षीय सुरभी वर्मा आणि ४५ वर्षीय पुरातत्व शास्त्रज्ञ आयआयटी दिल्लीतील प्रोफेसर यामा दीक्षित मातीचे नमुने गोळा करण्यासाठी १० फूट खोल खड्ड्यात उतरल्या होत्या.
मात्र अचानक मातीचा मोठा भाग आत घुसून दोघांच्या अंगावर पडला. ज्यात सुरभी वर्मा आणि यामा दीक्षित अडकल्या. दोघांना वाचवण्यासाठी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासह स्थानिक पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र सुरभी वर्माला वाचवता आले नाही. टीमचे इतर दोन सदस्य, असोसिएट प्रोफेसर व्हीएन प्रभाकर आणि सिनियर रिसर्च फेलो शिखा राय या खड्ड्याच्या बाहेर होत्या. दोघेही आयआयटी गांधीनगरच्या पुरातत्व विज्ञान केंद्रातील आहेत.
“ या टीमने लोथलमध्ये खड्डा खणला होता आणि ते नमुने गोळा करत होते. चार सदस्यांपैकी दोन जण जागीच गाडले गेले. अपघात स्थळ ते पोलीस ठाणे हे अंतर लांब असल्याने पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास १५ मिनिटे लागली. आम्ही प्रोफेसर दीक्षित यांना वाचवण्यात यशस्वी झालो पण त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि ऑक्सिजनची पातळी सामान्यपेक्षा कमी असल्याने त्यांना सीएचसी बगोद्रा रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर यामा दीक्षित यांना गांधीनगरच्या अपोलो रुग्णालयात नेण्यात आले," अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रकाश जाट यांनी दिली.