नवी दिल्ली - भारतीय औद्योगिक संस्थान म्हणजे आयआयटी हैदराबाद येथील संशोधकांनी दुधातील भेसळ ओळखण्यासाठी स्मार्टफोन आधारित एक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत एका पेपरचा वापर करण्यात आला आहे, जो अम्लताच्या वापरानुसार रंग बदलतो. संस्थेने याचा एल्गोरिदमही विकसित केला आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या सहाय्याने कागदाच्या रंगबदलाचा अंदाज लावून दुधातील भेसळीचे प्रमाण आपणास माहिती करून घेता येईल.
सध्या क्रोमैटोग्राफी आणि स्पेक्ट्रोस्कोपी तंत्राद्वारे भेसळ ओळखणे शक्य आहे. मात्र, ही बाब अतिशय खर्चीक आहे. त्यामुळेच भारतासारख्या विकसनशील देशातील लोक हे तंत्रज्ञान वापरत नाहीत. त्यामुळे लोकांना सहजपणे वापरता येतील आणि त्याची किंमतही सर्वसाधारण असेल, अशी उपकरणे निर्माण करणे आपली जबाबदारी असल्याचे हैदराबाद आयआयटीमधील संशोधनकर्त्यांच्या टीमचे प्रमुख प्रा. शिव गोविंद सिंह यांनी म्हटले आहे.
प्राध्यापक सिंह यांच्यामते, सर्वप्रथम संशोधक टीमने पीएच स्तराचे मोजमाप करण्यासाठी एक सेंसरचीफ आधारित तंत्रज्ञान विकसित केले, ज्याद्वारे दुधातील आम्लतेचे प्रमाण शोधणे सोपे झाले. त्यानंतर, नैनोसाईज्ड नायलॉन फायबरपासून बनलेल्या, कागदासारख्या प्रणालीचे उत्पादन करण्यासाठी इलेक्ट्रोस्पिनिंग नामक प्रक्रियेचा वापर केला आहे. जो तीन रंगाच्या मिश्रणाने बनला आहे. या पेपरला हेलोक्रोमिक पेपर असे म्हणतात. अम्लताच्या वापरानुसार हा पेपर रंग बदलतो. या संशोधकांनी एक प्रोटोटाईप स्मार्ट फोन आधारित एल्गोरिदम विकसित केला आहे. या पेपरला दुधात बुडविल्यानंतर त्या स्ट्रीप्सचा स्मार्टफोनच्या सहाय्याने फोटो घेता येतो. त्यानंतर तो डेटा पीएच रेंजमध्ये बदलला जातो. या चाचणीमध्ये आपणास 99.71 टक्के शुद्धतेचे वर्गीकरण मिळणार आहे. दरम्यान, ही प्रणाली अजून विकसित करण्यात येणार असून मोबाईल फोनचा कॅमेरा आणि लाईटच्या प्रभावाचा अभ्यास या संशोधन टीमद्वारे सुरू असल्याचेही सिंह यांनी सांगितले.