कानपूर: संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. हीच कोरोनाची तिसरी लाट असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर भर दिला जात असून, बुस्टर डोस देण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, देशातील वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या भीतीदायक असल्याचे बोलले जात आहे. यातच आता IIT कानपूरच्या एका प्रोफेसरांनी देशातील कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्यापर्यंत संपलेली असेल, असा दावा केला आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले IIT कानपूरचे प्रोफेसर मणिंद्र अग्रवाल यांनी आपल्या गणितीय सूत्रांचा वापर करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे. यापूर्वीही अग्रवाल यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत गणितीय सूत्रांच्या आधारे भाष्य केले होते. जानेवारीच्या महिन्याच्या अखेरीस आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च पीक असेल. मात्र, त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट कमी होण्यास सुरुवात होईल आणि मार्च महिन्यापर्यंत ती संपलेली असेल, असा दावा अग्रवाल यांनी केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक रुग्णसंख्या
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेच्यावेळेस पाहायला मिळू शकतात. दिल्लीत दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा आताच्या घडीला सरासरी २२ हजार असून, तो येत्या काही दिवसांत ४० हजारापर्यंत पोहोचू शकतो, असा दावाही प्रोफेसर अग्रवाल यांनी केला आहे. केवळ राजकीय प्रचारसभा कोरोना वाढीचे कारण नसून, अन्य अनेक कारणे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचे अग्रवाल म्हणाले.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ६८ हजार ६३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर २७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६९,९५९ जण कोरोनामुक्त झाले. पण देशातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ८ लाख २१ हजार ४४६ पर्यंत वाढली आहे. देशातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी दर हा १०.६४ टक्के इतका झाला आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या देशात ४ हजारांवर गेली आहे. देशात ४ हजार ४६१ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.