कोलकाता : आयआयटी खरगपूरची ओळख नामवंत अभियंत्यांसाठी असली तरी लवकरच या प्रतिष्ठित संस्थेत एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. आयआयटी कॅम्पसला लागून असलेल्या तीन एकर भूखंडावर ४०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार असून डॉ. बी. सी. रॉय वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था २०१७ च्या अखेरीस पूर्णत्वास येईल.सरकारने या संस्थेसाठी गेल्या वर्षी २३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच बांधकाम सुरू होणार असून २६ महिन्यांमध्ये ते पूर्ण होईल, असे आयआयटी केजीपीचे संचालक पार्थप्रतीम चक्रवर्ती यांनी सांगितले. या संस्थेत एमबीबीएससारखे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मेडिकल कौन्सिलची (एमसीआय)परवानगी मागण्यात आली आहे. आयआयटी खरगपूर ही संस्था अभियांत्रिकी अभ्यासासाठी जगभरात प्रसिद्ध असून वैद्यकीय शिक्षणात प्रवेश करणारी ही पहिली आयआयटी संस्था ठरणार आहे. स्थानिक रुग्णांची सेवा करण्यासह हे रुग्णालय जैववैद्यकीय, क्लिनिकल आणि अन्य संशोधनाचे कार्य सुरू करेल. औषधांचे डिझाईन आणि पुरवठा यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील संशोधनातही हे रुग्णालय योगदान देणार आहे. (वृत्तसंस्था)
आयआयटी आता डॉक्टरही घडविणार
By admin | Published: June 22, 2015 11:50 PM