पाटणा : हे गाव लई न्यारं... इथली पोरंही लई हुशार... बुद्धिमत्तेच्या जोरावर पटवा टोली या गावाची ओळखच बदलून टाकत या गाव-शिवारातील विद्यार्थ्यांनी ‘आयआयटी’वाल्यांचं गाव म्हणून यास लौकिक मिळवून दिला. बिहारचे माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळ ‘टॉपर’ घोटाळ्याने गाजत असताना पटवा टोली गावाच्या १५ विद्यार्थ्यांनी २०१७ मध्ये आयआयटी प्रवेश परीक्षेत प्रावीण्यासह यश मिळविले आहे.बिहारच्या गया जिल्ह्यातील पटवा टोली हे गाव अभियंत्यांचे गाव म्हणून सर्वत्र चर्चेत आहे. या गावातील विद्यार्थ्यांनी २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत सलगपणे अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत गुणवत्तेचे झेंडे रोवले आहेत. या गावातील २०१६ मध्ये ११, तर २०१५ मध्ये १२ मुले आयआयटी प्रवेश परीक्षेत यशस्वी झाले होते. पटवा टोली गावातील ३०० मुले अभियंता म्हणून गावाची शान वाढवीत आहेत. यापैकी एकतृतीयांश मुले आयआयटी झाले असून, उर्वरित एनआयटी आणि राज्यातील अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंता म्हणून सेवा बजावत आहेत.पटवा टोलीच्या लोकसंख्येत ९० टक्के लोकसंख्या पटवा समुदायाची आहे. विणकरांचे गाव अशी ओळख असलेल्या या गावात हातमागासोबत यंत्रमागाचा सारखा खडखडाट असतो. कुटुंबाला हातभार लावण्यास बव्हंशी मुलांना शिक्षण घेत कामही करावे लागते. विशेष म्हणजे या गावातील दोन मुलींनीही आयआयटी प्रवेश परीक्षेत यश मिळविले होते. स्पर्धात्मक परीक्षांच्या अन्य पर्यायांकडे येथील मुलांचा कल वाढत आहे. (वृत्तसंस्था)
आयआयटीयन्सचे गाव... पटवा टोली
By admin | Published: June 29, 2017 12:29 AM