कन्नौज जिल्ह्यातील ए.आर.टी.ओ इज्या तिवारी यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. इज्या यांचं जीवन संघर्षांनी भरलेलं होतं. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. वयाच्या १२ व्या वर्षी वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणं बदललं. वडिलांच्या आजारपणामुळे आणि मृत्यूमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि एक वेळ अशी आली की, घरात अन्नासाठीही पैसे नव्हते. असं असूनही, इज्या यांनी त्यांच्या आईला साथ दिली आणि अडचणींचा सामना करूनही अभ्यास सुरू ठेवला.
कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने, इज्या तिवारी यांनी केवळ स्वतःची प्रगती केली नाही तर आईलाही शिक्षणासाठी प्रेरित केलं. २०१४ मध्ये बँकेत नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवलं. बँकेची नोकरी केल्यानंतर रात्री ९ ते पहाटे २-३ पर्यंत अभ्यास करायच्या आणि दिवसभर कुटुंबाची काळजी घ्यायच्या. त्याच्या कठोर परिश्रमाचं फळ त्यांना त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात २०१८ मध्ये उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (UPPSC) परीक्षेत यश मिळालं. इच्छा प्रबळ असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते हे इज्या यांच्या यशाने सिद्ध केलं आहे.
इज्या यांची गोष्ट फक्त यशाचीच नाही तर एका मुलीने तिच्या आईसाठी केलेल्या संघर्षाचीही आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईचं मानसिक संतुलन परत बिघडलं. मात्र इज्या यांच्यासाठी ही परिस्थिती अवघड होती, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. आईला ग्रॅज्युएशनचा अभ्यास करून पुढे जाण्याची प्रेरणाही दिली. जीवनात कितीही अडचणी आल्या, आत्मविश्वास आणि मेहनत एकत्र आल्यास कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं, हे यातून दिसतं.
इज्या तिवारी यांचं मत आहे की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळेचा अभ्यासासाठी योग्य उपयोग केला पाहिजे. जर तुम्ही कठोर परिश्रम केलेत तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकता. अभ्यासाला आयुष्यात प्राधान्य दिलं आणि कामासोबतच इज्या यांनी सतत ५ ते ६ तास अभ्यास केला. कोणत्याही परिस्थितीत निराश होण्याची गरज नाही, कारण यश निश्चितपणे कठोर परिश्रमाने मिळते असं म्हटलं आहे.