ऑनलाइन लोकमत
बिसाहदा (दादरी), दि. ५ - घरात गोमांस साठवून खाल्ल्याच्या अफवेनंतर गावक-यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मोहम्मद इखलाखने स्वत:ला व कुटुंबाला वाचवण्यासाठी आपल्या लहानपणापासूनचा जिवलग हिंदू मित्र असलेल्या मनोज सिसोदियाला फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे. इखलाखच्या फोननंतर मनोजन तातडीने पोलिसांना फोन करून इखलाखच्या घरी धाव घेतली खरी, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गावक-यांच्या बेदम मारहाणीमुळे इखलाखने आपला जीव गमावला तर त्याचा तरूण मुलगा दानिश गंभीर जखमी झाला.
इखलाख त्यांच्या कुटुंबीयांनी घरात गोमांस साठवून ठेवले असून ते खातही असल्याची अफवा गावात पसरली होती. त्यानंतर २०० लोकांच्या संतप्त जमावाने त्यांच्या घरावर हल्लाबोल करत दगडविटांनी घरातील लोकांना मारहाण सुरू केली. या हल्ल्यातून बचावासाठी इखलाखने मनोजला फोन केला, रात्री झोपायची तयारी करत असलेल्या मनोजने तत्काळ पोलिसांना पोन करत इखलाखच्या घरी पोहोचण्यास सांगितले व त्यांनीही इखलाखच्या घरी धाव घेतली. मात्र तोपर्यंत इखलाखचा मृत्यू झाला होता.
' मी रात्री घरी झोपण्याची तयारी करत होतो, तेवढ्यात मला इखलाखचा फोन आला, तो खूप घाबरलेला होता. मनोज भाई, आम्ही खूप मोठ्या संकटात आहोत, कसही करून पोलिसांना फोन कर आणि फोर्स बोलावं' असे त्याने मला फोनवर सांगितले. तेच त्याचे शेवटचे शब्द होते. मी पोलिसांना फोन केला आणि माझ्या मित्राचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले. त्यानंतर मी लगेच इखलाखच्या घरी धाव घेतली, पण मला त्याच्या घरी पोहोचायला काही मिनिटांचा उशीर झाला. जमावाच्या मारहाणीमुळे इखलाखचा मृत्यू झाला होता तर त्याचा मुलगा (दानिश) गंभीर जखमी झाला होता. मी जरा लवकर पोहोचलो असतो, तर मी माझ्या मित्राचा जीव वाचवू शकलो असतो. मी व इखलाख बालपणापासूनचे मित्र आहोत, मी कित्येक वेळेस त्याच्या घरी जेवलो आहे.आत्तापर्यंत सगळं सुरळीत होतं, पण आता सगळचं मोडलं आहे. दानिश सध्या रुग्णालयात असून त्याचा जीव वाचवण्यात तरी यश मिळाले, याचे मला समाधान आहे असे मनोज म्हणाले.