नवी दिल्ली : इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस (आयएलअँडएफएस) मनीलाँड्रिंग आणि ५७0 कोटी रुपयांच्या मालमत्तांची जप्ती या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहिले आरोपपत्र दाखल केले आहे.आयएलअँडएफएसप्रकरणी ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील निवासी व व्यावसायिक इमारती आणि बँक खाती जप्त केलेली आहेत. आयएलअँडएफएस फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. (आयएफआयएन) कंपनीच्या संचालकांच्या या मालमत्ता आहेत.मालमत्ता जप्त झालेल्या संचालकांत रवी पार्थसारथी, रमेश बावा, हरी शंकरम, अरुण साहा आणि रामचंद करुणाकरन यांचा समावेश आहे. शिवशंकरन यांच्या कुटुंबियांच्या आणि इतर नातेवाईकांच्या, तसेच समूहातील काही कंपन्यांच्या मालमत्ताही ईडीने जप्त केल्या आहेत. जप्त मालमत्तांची एकूण किंमत ५७0 कोटी रुपये आहे.आयएलअँडएफसी समूहातील अनेक कंपन्यांवर ईडीने १९ फेब्रुवारी रोजी मनीलाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या कंपन्यांच्या अनेक संचालकांना बेकायदेशीररीत्या लाभ दिल्याचा ईडीचा आरोप आहे.ईडीने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, संचालकांनी एकमेकांशी, तसेच खाजगी संस्थांशी संगनमत करून स्थापित नियमांचे सर्रास उल्लंघन केले. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि कर्जाचे हप्ते थकविणाऱ्या अनेक कंपन्यांना त्यांनी प्रचंड प्रमाणात कर्जे वितरित केली. यातील अनेक कंपन्यांनी ‘आयएफआयएन’कडून घेतलेली कर्जेही थकविलेली होती.शिवा समूहाकडे ४९४ कोटी थकलेईडीच्या तपासात असे आढळून आले की, आपली कमाई अशीच चालू राहावी यासाठी संचालकांनी ‘आयएफआयएन’च्या लेख्यांत हेराफेरी करून कंपनीची पत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.आयएलअँडएफएस समूहाच्या वार्षिक ताळेबंदातही त्यांनी फेरफार केले. या बेकायदेशीर कारवायांमुळे कंपनीचा तोटा आणखी वाढला. याच मोडस आॅपरेंडीचा वापर करून संचालकांनी शिवशंकरन यांच्या शिवा समूहाला बेकायदेशीररीत्या मोठी कर्जे दिली. शिवा समूहाकडे आता ४९४ कोटी रुपये थकलेले आहेत.
आयएलएफएस घोटाळा; ईडीचे पहिले आरोपपत्र, ५७0 कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 5:30 AM