एस. पी. सिन्हा -
धनबाद : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात चिरकुंडा भागामध्ये गुरुवारी सकाळी कोळशाच्या अवैध उत्खननामुळे खाण कोसळून ७० जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण बंगालचे रहिवासी असल्याचे समजते. परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात बंद झालेल्या खनन क्षेत्रात ही दुर्घटना घडली, असे सांगितले जाते. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता जुमरीजोडजवळ रस्ता खचला. त्यानंतर खाण खचली. त्यात उत्खनन करणारे लोक अडकले. ५० मीटर क्षेत्रात हा प्रकार घडला. जुमरीजोड-चांच लाईनवर अचानक रेल्वे लाईनचा रस्ता मोठा आवाज होऊन धसला. याचबरोबर विजेचा खांबही जमिनीत गेला. या घटनेनंतर लोक घाबरले व त्यांनी याची माहिती पोलीस व बीसीसीएल व्यवस्थापनाला दिली.
दररोज १५० टन कोळशाचे उत्खनन : या भागात प्रदीर्घ काळापासून अवैध उत्खनन सुरू आहे. येथे दररोज १५० टन कोळशाचे उत्खनन होते, असे सांगितले जाते. तरीही याकडे कोणी लक्ष देत नाही. यापूर्वीही या भागात अवैध खाण कोसळून अनेकांनी प्राण गमावले आहेत. एक महिन्यापूर्वीच दहीबाडी व सी पॅचमध्ये अवैध उत्खनन सुरू असताना जमीन खचल्यामुळे अनेकांचे प्राण गेले होते. जिल्हा प्रशासनाने ५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.