सिरसा, दि. 9- बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहिमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सध्या सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान अनेक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती उघड होते आहेत. तसंच सगळ्यांनाच थक्क करणारी राम रहिमची मालमत्तासुद्धा सापडते आहे. डेरातून अशीच रहस्य समोर येत असताना आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात अवैध फटाक्यांचा कारखाना तपास पथकाला आढळून आला आहे. या कारखान्याला पोलिसांनी टाळं ठोकलं असून त्यातील स्फोटकं आणि फटाके ताब्यात घेतले आहेत.
बलात्कार प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची निमलष्करी दल आणि हरयाणा पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. या सर्च ऑपरेशनचा आजचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी दिवसभर झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये रोख रकमेसह अनेक महागड्या वस्तू या मुख्यालयात सापडल्या. आजच्या दुसऱ्या दिवशीही तपासणी सुरू आहे. मुख्यालयात स्फोटकं आणि फटाक्यांचा कारखाना आढळून आला आहे. पोलिसांनी कारखान्याला टाळं ठोकलं आहे. तसंच पोलिसांनी तीन अनुयायांना अटक केली आहे. ५ कोटी खर्च करून हिंसा भडकवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चमकौर सिंह, कर्मजीत आणि दानसिंह अशी त्यांची नावं आहेत. डेरा पंचकुला शाखेचा प्रमुख असलेला चमकौर सिंह हा मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे.
डेरा सच्चा सौदामध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान फटाक्यांचा कारखाना आढळला असून तो बेकायदेशी आहे, असं राज्य माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक सतीश मेहरा यांनी सांगितलं. सतीश मेहरा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी प्रशासनाने अधिकृतरीत्या परवानगी दिली आहे. तो बेकायदेशीर कारखान सील करण्यात आल्याचंही मेहरा यांनी सांगितलं आहे.
डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात शुक्रवारी दिवसभरात झडती घेतल्यानंतर शनिवारी म्हणजेच सर्च ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तपासणीला पुन्हा सुरुवात झाली. पंजाबमधून बोलावण्यात आलेल्या १४ लोहारांनी मुख्यालयातील कार्यालयांचे टाळे तोडले. या मुख्यालयात अवैध फटाक्यांचा कारखाना असल्याचं आढळून आले. हा कारखान्याला पोलिसांनी टाळं ठोकलं आहे. या कारखान्यात स्फोटकंही सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, राम रहिम ज्या ठिकाणी ध्यानधारणेला बसायचा त्या ठिकाणचं खोदकाम सुरू झालं आहे. जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आलं आहे.तसंच कार्यालयातून मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. एका व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे. हा अनुयायी असून झडतीदरम्यान मोबाईल फोनमध्ये त्याचं चित्रण करत होता, अशी माहिती समोर येते आहे.
शुक्रवारी डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून शुक्रवारी सापडल्या या वस्तूराम रहिमच्या तब्बल ८00 एकरात वसलेल्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाची सशस्त्र सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाडाझडती घेतली आणि नोंदणी न झालेल्या असंख्य लक्झरी व मॉडिफाइड कार्स, चलनातून बाद झालेल्या नोटा, अनेक लॅपटॉप व कॉम्प्युटर्स, हार्ड डिस्क्स, कसलीही लेबल नसलेली औषधं आदी साहित्य जप्त केलं. शाळा, महाविद्यालय, अम्युजमेंट पार्क, मॉल, दुकाने, रुग्णालय याबरोबरच मसाला बनवण्याची फॅक्टरी, चित्रपटगृह असल्याचं आढळून आलं. याशिवाय राम रहीमच्या गुहेकडे जाणारा गुप्त मार्ग शोधण्यात आला. तेथे अनेक एकरांवर सेंद्रिय शेती होते. आतमध्ये हजारांहून अधिक मजूर व कामगार आतापर्यंत काम करीत होते.या सर्च ऑपरेशनमध्ये येथील काही खोल्या सील करण्यात आल्या आहेत. ओबी व्हॅन, हजार रुपयांच्या ७००० बाद झालेल्या नोटा, १२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कर्नाल आणि सोनिपत येथून न्यायवैद्यक पथक दाखल झाले होते. न्यायवैद्यक तज्ज्ञांना उत्तराखंडातून बोलाविण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. एस. पवार यांच्या देखरेखीखाली या तपासाची व्हिडीओग्राफी आणि निरीक्षण केलं जात आहे.