राजस्थानमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर एका पतीने आपल्या पत्नीच्या बेकायदेशीर सरकारी नोकरीचा पर्दाफाश केला, ज्यामुळे संपूर्ण प्रकरण सीबीआयपर्यंत पोहोचलं. राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील नादौटी येथील रोंसी गावातील रहिवासी मनीष मीना यांनी त्यांची पत्नी सपना मीनाला एका डमी उमेदवाराद्वारे रेल्वेमध्ये नोकरी मिळवून दिली होती, परंतु काही महिन्यांनंतर पत्नी तो बेरोजगार असल्याचं सांगून सोडून गेली.
मनीषचा दावा आहे की, लग्नानंतर त्याने सपनाला प्रशिक्षण दिलं आणि तिला रेल्वे परीक्षेला बसण्यास मदत केली. पण सपनाचे मामा चेतनराम यांनी एका डमी उमेदवारामार्फत १५ लाख रुपयांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी करार केला. या काळात रेल्वे गार्ड राजेंद्रने एजंटची भूमिका साकारली आणि लक्ष्मी मीना नावाच्या मुलीला परीक्षेला बसवण्यात आलं.
मनीषने त्याची जमीन गहाण ठेवली आणि १५ लाख रुपये कर्ज घेतलं आणि सपनाला नोकरी मिळवून दिली. पण सपनाने ६ महिन्यांनी नोकरी सोडली. पत्नीच्या फसवणुकीचा बळी ठरलेल्या मनीषने हे प्रकरण उघड करण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे विभाग आणि सीबीआयकडे तक्रार दाखल केली.
सीबीआयने करौली, कोटा आणि अलवर येथे छापे टाकून कागदपत्रं जप्त केली. तपासात असे दिसून आलं की सपना मीनाने पॉइंट्समनच्या कामासाठी डमी उमेदवार लक्ष्मी मीनाचा वापर केला होता. चौकशीनंतर रेल्वे विभागाने सपना मीना यांना निलंबित केलं, तर सीबीआयने सपना आणि लक्ष्मी मीना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.