रांची - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्यावर ईडीचा पाश अधिकाधिक आवळत चालला आहे. आता ईडीने एक मोठं जहाज जप्त केलं आहं. हे जहाज अवैध खाणकामासाठी पंकज मिश्रा यांच्या आदेशावर वापरण्यात येत होतं. या जहाजाची किंमत ३० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
अवैध खाणकामाशी संबंधित तपासामध्ये पंकज मिश्रा यांना ईडीने आधीच अटक केली आहे. आता मंगळवारी हे जहाज पकडण्यात आले. या जहाजाचं नाव M.V.Infralink- III असं आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार हे जहाज कुठल्याही परवान्याविना अवैध पद्धतीने वापरले जात होते. या जहाजाने साहेबगंज, सुकरगड घाटातून परमिट घेतलं नव्हतं. हे जहाज राजेश यादव उर्फ दाहू यादव यांच्या आदेशावर चालत होतं. पंकज मिश्रा दाहू यादवचे सहकारी होते. या जहाजामधून अवैध खाणकाम करून काढण्यात आलेल्या दगडांची वाहतूक होत होती.
या मोठ्या नावेची किंमत ३० कोटी रुपये आहे. या जहाजाच्या मालकांविरोधात २६ जानेवारी रोजी एक एफआयआर नोंद करण्यात आली होती.