ऑनलाइन लोकमत
चित्रकूट, दि. 23 - हिंदूंची मंदीरे तोडण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या औरंगजेबाने चित्रकूट येथे बालाजीचे मंदीर बांधले होते, मात्र आज दांडग्यांनी अनधिकृतपणे ही जागा बळकावली असल्याचे चित्र आहे. औरंगजेबाने बांधलेल्या या मंदीराला या महिन्यात 333 वर्षे पूर्ण झाली आहेत. औरंगजेबाने त्यावेळी राजभोगाचीही व्यवस्था लावून दिली त्यासाठी पैसे व 330 बिघा जमीन मंदीरासाठी दिली. औरंगजेबाचे फर्मान आजही मंदीर व्यवस्थापनाकडे उपलब्ध आहे. आजही सरकारी खर्चाने राजभोगाची प्रथा सुरू आहे, परंतु आसपासची जमीन दांडग्यांनी लाटल्याचे चित्र आहे.
स्थानिक परीसरात चालत आलेल्या कथेनुसार औरंगजेबाने चित्रकूट परीसराला ज्यावेळी भेट दिली, त्यावेळी येथील सगळी मंदीरे व मठ पाडण्याचे आदेश त्याने सैनिकांना दिले. परंतु शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सैनिकांना पोटदुखी सुरू झाली व ती काही केल्या बरी होईना. सैनिक बेशुद्ध पडायला लागले आणि घाबरलेल्या औरंगजेबाच्या सैनिकांना बाबा बालक दास यांनी बरे केले. मंदीरं तोडणं बंद करावं असं बाबांनी सांगितलं. सैनिक चमत्कार झाल्यासारखे बरे झाले आणि औरंगजेबानेही बाबांना दिलेला शब्द पाळत केवळ मंदीरं तोडणं थांबवलं नाही, तर नवं मंदीर बांधण्याचा आदेश देत त्याच्या उत्पन्नाची व्यवस्था लावली.
तत्कालिन स्थानिक राजा पन्ना नरेश हिंदूपत, नंतर इंग्रज आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय प्रशासन या सगळ्यांनी राजभोग सरकारी खर्चानं करण्याची प्रथा सुरू ठेवली आहे. मात्र, परीसरातली मंदीराच्या मालकीची जमीन मात्र बेकायदेशीररीत्या लाटण्यात आल्याचे चित्र आहे.