Jammu and Kashmir Assembly Election 2024: जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. १९ सप्टेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. काश्मीरमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने निवडणूकपूर्व युती केली आहे. भाजप येथे एकटा लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कलम ३७० आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कलम ३७० हटवण्याचे श्रेय भाजप घेत आहे. हे कलम आता इतिहासजमा झाला आहे. ते कधीच परत येऊ शकत नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्स आपल्या अधिकारात नसतानाही कलम ३७० पुन्हा लागू करणार असल्याचे सांगत आहे. अशातच निवडणुकीत उतरलेल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी कलम ३७० बाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील ९० विधानसभा जागांवर होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी खोऱ्यातील राजकीय तापमान वाढले आहे. कलम ३७७ हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाकडून बिजबेहारा विधानसभा मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. मला एका महानगर पालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही, असं रोखठोक विधान इल्तिजा मुफ्ती यांनी केलं आहे.
"जेव्हा तुम्ही एखाद्या राजकीय कुटुंबात वाढता तेव्हा बाहेरचे लोक म्हणतात की तू पुढची मुख्यमंत्री असणार आहेस. याने मला खूप चांगले वाटेल असं लोकांना वाटतं. पण हे एक काटेरी मुकूट आहे. जेव्हा तुम्ही त्या पदावर जाता तेव्हा तुमची शक्ती कमी होते. लोक म्हणतात की, तुम्ही पुढच्या मुख्यमंत्री होणार आहात तेव्हा मला ती प्रशंसा वाटत नाही. मला खूप पुढे जायचं आहे. मला एका महानगर पालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही. आमचा स्वतंत्र राज्याचा दर्जा होता, आमचे कायदे होते. कलम ३७० आम्ही पुन्हा आणू," असं इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.
"मी इतक्या गावात जाते की तिथल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची जोडणी किंवा रस्ते नाहीत. मेहबुबा मुफ्ती यांचा आग्रह मी मान्य केला आहे. मी थोडी दबंग प्रकारची आहे, मेहबूबा मुफ्ती भावनिक आहेत. तुम्ही राजकारणात गेलात तर सर्वांचे ऐकून घ्याल आणि काम कराल, असे लोकांनी मला सांगितले," असंही इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती राज्याच्या बिजबेहारा मतदारसंघातून निवडणूक लढवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. या जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या मुफ्ती कुटुंबातील त्या तिसऱ्या पिढीतील आहेत.