दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच भाजप आणि काँग्रेसवर मोठा हल्ला चढवला आहे. गुजरातकाँग्रेस लवकरच गुजरात भाजपमध्ये विलीन होईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
पत्रकारांसोबत बोलताना केजरीवाल म्हणाले, 'गुजरात निवडणूक आप आणि भाजप यांच्यात होणार आहे. गुजरात काँग्रेस लवकरच गुजरात भाजपमध्ये विलीन होणार आहे. भाजप-काँग्रेसचे ईलू-ईलू संपणार आहे. याच वेळी एकीकडे भाजपचे '27 वर्षांचे कुशासन' आहे. तर दुसरीकडे आपचे 'नवे राजकारण' आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
मोफत वीज देण्याचे आश्वासन -आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासंदर्भात आणि मोफत वीज देण्यासंदर्भात अनेक आश्वासने दिली. यावेळी, पंजाबमध्ये जवळपास 25 लाख घरांना नुकतेच 'शून्य' वीज बिल आले आहे आणि दिल्लीतील अनेक लोकांनाही अशीच सुविधा मिळत आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच 'आमचे पहिले वचन विजेसंदर्भात आहे. गुजरातमधील लोक वीजबिलाच्याबाबतीत अत्यंत त्रस्त झाले आहेत, असेही केडरीवाल यांनी म्हटले आहे.
यापूर्वी, केजरीवाल यांनी ट्विट करत, ''आम आदमी पक्षाचा गुजरातमध्ये वेगाने विस्तार होत आहे. यामुळे भाजपमध्ये अत्यंत घबराट निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करणार आहे, हे सत्य आहे का? भूपेंद्रभाई पटेल यांच्या कामावर भाजपही नाराज आहे?'' असे ट्विट केले होते.