अॅपलचा आयफोन वापरणारे खासदार असदुद्दीन ओवेसी, महुआ मोईत्रा, शशी थरूर आणि राघव चढ्ढा यांच्यासह अनेक नेत्यांनी मंगळवारी एक अलर्ट संदेश शेअर केला आणि आरोप केला की ते टॅप केले जात आहेत. ओवेसीसह अनेक नेत्यांनी अॅपलचा चेतावणी संदेश शेअर केला होता, ज्यात लिहिले होते - अॅपलला वाटते की राज्य प्रायोजित हल्लेखोरांकडून तुम्हाला लक्ष्य केले जात आहे. कदाचित हल्लेखोर तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करत असतील. तुमचे कामही याला कारण असू शकते. मात्र, आता याबाबत अॅपलचे वक्तव्य समोर आले असून, हे खोटे इशारे असून सरकारने असे काहीही केले नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावरुन आता सरकारवर आरोप केले आहेत. गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फोन टॅपिंगला मी घाबरत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, केसी वेणुगोपाल, पवन खेडा, सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेत्यांना असे अलर्ट आले आहेत. 'भाजप आणि अदानी यांच्याविरोधात फार कमी लोक लढत आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढा फोन तुम्ही टॅप करू शकता. मला त्याची पर्वा नाही. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला माझा फोन देऊ शकतो. आम्ही घाबरत नाही आणि लढायला तयार आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले.
'नरेंद्र मोदी सरकारचा आत्मा अदानी समूहासोबत असल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. अदानींवर प्रश्न उपस्थित होताच ईडी आणि सीबीआय सक्रिय होतात. संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण विरोधकांचे डोळे अदानींकडे लागले असून सरकार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. 'मोदी सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर आणि नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोदींचा आत्मा अदानींमध्ये आहे, म्हणूनच त्यांनी अदानींसाठी कृषी कायदा केला. विमानतळ, बंदरे, सिमेंट कारखाने आणि इतर पायाभूत सुविधा अदानींकडे सोपवण्यात आल्या आहेत, असंही गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, अदानी यांची मक्तेदारी झाली असून त्यामुळे देशातील तरुणांचे नुकसान होत आहे. देशातील जनतेचा पैसा हिसकावून अदानींना दिला जात आहे. जात जनगणनेशिवाय देशात काहीही होऊ शकत नाही,देशातील जनता अदानींकडून वीज विकत घेते, कोळशापासून वीज निर्माण होते आणि कोळसा अदानींकडे दिला जातो. जनतेवर मनमानी कर लादून अदानी मोदी सरकारकडून पैसे उकळत असून देशातील दलित-आदिवासींचा पैसा लुटला जात आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.