नवी दिल्ली - गोरखपूरचे खासदार, भाजपा नेते आणि अभिनेता रवि किशन यांनी भोजपूर गाण्यातील अश्लीलतेला चाफ बसविण्याची भूमिका घेतली आहे. अश्लील गाणे लिहिणे आणि गाणे या दोन्हींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रवि किशन यांनी दिलाय. भोजपूरी चित्रपटातील अश्लीलतेच्या मुद्द्यावर खासदार महोदयांनी प्रहार करण्याचं ठरवलंय. तसेच, भोजपूर चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची मागणीही रवि किशन यांनी केलीय.
भोजपूरी गाण्यांची ओळख ही अश्लीलता अशीच बनली असून भोजपुरी चित्रपटांकडेही त्याच नजरेतून पाहिलं जात. सोशल मीडियावर अनेकदा भोजपूरी गाणे व्हायरल होतात. या गाण्यातील नृत्य आणि त्याचे शब्द अश्लील असल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळेच, रवि किशन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्र लिहिले आहे. अयोध्येतील पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. अयोध्येत सध्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामलिला आयोजित करण्यात आली आहे. या रामलिला मध्ये रवि किशन हे भरतची भूमिका साकारत आहेत. त्यासाठीच, ते अयोध्येत मुक्कामी आहेत.
भोजपूरी भाषा 1000 वर्षे जुनी असून काहींनी या भाषेत अश्लीलेची फोडणी देत ही भाषा खराब केली आहे. त्यामुळेच, या गाण्यांविरुद्ध आणि चित्रपटाविरुद्ध मी कायदेशीर कारवाईची मागणी करत असल्याचं रवि किशन यांनी म्हटलंय. याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
गोरखपूरला फिल्म शुटींगचे हब बनवणार
गोरखपूरला फिल्म शुटींगचे हब बनविण्यात येत आहे. स्वित्झर्लंडला कुणीही ओळखत नव्हते, पण यश चोप्रांच्या चित्रपटातून स्वित्झर्लंडची ओळख गाव-खेड्यापर्यंत पोहचली. त्यामुळे, गोरखपूर येथे फिल्मसिटी बनविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीच उत्तर प्रदेशात फिल्मसिटी करण्याची घोषणा केली आहे. तसेच, गोरखपूर विश्विविद्यालयात अॅक्टींग अँड फिल्म मेकिंगचा कोर्स सुरू करण्याची मागणीही कुलपती यांच्याकडे करणार असल्याचे किशन यांनी म्हटले.