ऑनलाइन लोकमत
हुबळी, दि. 29 - स्वच्छ भारतासाठी पुढाकार घेत कोपल जिल्ह्यातील 45 वर्षीय भाजीवालीने एक अनोखी शक्कल लढवली आहे. मोदींची चाहती असणारी ही भाजीवाली घरात शौचालय असणा-या कुटुंबांना एक किलो टोमॅटो फुकट देते. शरणम्मा असं या भाजीवालीचं नाव आहे. गंगावती तालुक्यातील दानापूर गावची ती रहिवासी आहे. गावातील 1300 कुटुंबांपैकी 500 कुटुंबांच्या घरी शौचालय नसल्याचं कळल्यानंतर त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली.
शरणम्मा गावातील प्रत्येक काना कोप-यात जाऊन शौचालयाचं महत्व पटवून देतात. यामुळे पर्यावरण स्वच्छ कसं राहिल हेदेखील समजावून सांगतात. 'मी रोज बाजारातून 120 किलो टोमॅटो विकत घेते', असं शरणम्मा सांगतात. 'गेल्या 25 वर्षांपासून मी फक्त भाजी विकून आपलं पोट भरत आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय उभारण्यासाठी प्रेरित करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींची चाहती आहे,' असं शरणम्मा यांनी सांगितलं आहे.
'स्वच्छता अभियानासाठी मी दारोदारी जाते आणि लोकांना शौचालयाचे फायदे सांगते. शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून मिळणा-या आर्थिक मदतीसंबंधीदेखील मी सांगते', असं शरणम्मा बोलल्या आहेत. शरणम्मा यांनी शौचालय नसणा-या घरांमध्ये आतापर्यंत 300 किलो टोमॅटो फुकट वाटले आहेत.