नवी दिल्ली : दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी आपला धाकटा मुलगा शबान यास नायब इमाम व आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर करण्यास आणि त्यासाठी आयोजित केलेल्या दस्तरबंदी कार्यक्रमास कोणतेही कायदेशीर अधिष्ठान नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केले.शाही इमामांनी आपल्या मुलाच्या पदग्रहणानिमित्त शनिवार २२ नोव्हेंबर रोजी दस्तरबंदी कार्यक्रम आयोजित केला आहे. शाही इमामांनी स्वत:च आपला उत्तराधिकारी नेमण्यास आव्हान देणाऱ्या तीन जनहित याचिकांवर मुख्य न्यायाधीश न्या. श्रीमती जी. रोहिणी व न्या. आर. एस. एंडलॉ यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेश देताना हे मत नोंदविले.मात्र शनिवारच्या दस्तरबंदी कार्यक्रमास अंतरिम स्थगिती देण्यास नकार देताना न्यायालयाने नमूद केले की, एक तर शाही इमामांनी आपला उत्तराधिकारी जाहीर करणे व त्यासाठी दस्तरबंदीचे आयोजन करणे यास कायद्याचा कोणताही आधार नसल्याने त्यास स्थगिती देण्याची मुळात गरजच नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इमामांनी मुलास वारसदार नेमणे बेकायदा
By admin | Published: November 22, 2014 2:35 AM