नवी दिल्ली: दक्षिण-पूर्व आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ज्यामुळे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी चक्रीवादळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अरबी समुद्रातील या वर्षातील हे दुसरे चक्रीवादळ असेल. कमी दाबाच्या पट्ट्याचे जर चक्रिवादळात रुपांतर झाल्यास त्यास 'तेज' नावानं ओळखलं जाईल.
हवामान विभागाच्या खात्यानुसार, हे चक्रीवादळ रविवारपर्यंत तीव्र चक्री वादळात रूपांतरित होऊन दक्षिणेकडील ओमान आणि येमेनच्या किनारपट्टीला धडकू शकते. मात्र, मागील चक्रीवादळ बिपरजॉयप्रमाणे हे वादळही आपला मार्ग बदलू शकेल, अशी भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
बिपरजॉय वादळ अरबी समुद्रात वायव्य-पश्चिम दिशेने सरकणार होते, पण त्याने आपली दिशा बदलली आणि गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची किनारपट्टीला धडकले. चक्रीवादळ येमेन-ओमानच्या किनारपट्टीवरच धडकेल, असे संकेत आतापर्यंत मिळाले आहेत. जागतिक हवामान अंदाजानुसार हे वादळ अरबी समुद्रात असून ते पाकिस्तान आणि गुजरातच्या किनारपट्टीवर आपला मार्ग बदलण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळात ताशी ६२-८८ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.