IMD Monsoon forecast: भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) नैऋत्य मोसमी वाऱ्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला असून यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी मानली जात आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मोजणीनुसार ९६ टक्के ते १०४ टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.
भारतात यंदा मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात ९२ ते १०८ टक्के इतका होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, दख्खनच्या पठारावर ९१ ते १०७ टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात ९५ टक्के तर मध्य भारतात १०६ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला हा अंदाज जून ते सप्टेंबर महिन्यासाठीचा आहे.