देशाची राजधानी दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्यानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये ढगाळ वातावरण असेल. 21 आणि 22 सप्टेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीनुसार, गेल्या मंगळवारी दिल्ली-एनसीआरमध्ये ढगाळ हवामान होते. आजही असेच हवामान राहण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशातही हवामानात सतत बदल होत आहेत.
2-3 दिवसांनी राज्यात पुन्हा मान्सून वाऱ्यांचे क्षेत्र विकसित होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यासोबतच 22-23 सप्टेंबर रोजी राज्यातील भोपाळ, ग्वाल्हेर, चंबळ, रेवा, इंदूर आणि उज्जैनमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तराखंडच्या हवामानाबाबत पुन्हा एकदा हवामान केंद्राने पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. तर डेहराडून, नैनिताल आणि बागेश्वरमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील तीन दिवस उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, आज गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण राजस्थानमधील काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
ईशान्य भारत, सिक्कीम, ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कोकण आणि गोवा, अंदमान आणि लक्षद्वीप, तेलंगणाचा काही भाग आणि अंतर्गत भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम राजस्थान, विदर्भ, मराठवाडा आणि आंध्र प्रदेशमध्ये पावसाची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.